छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. १९ सप्टेंबर पासून बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी ३चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. त्यानिमित्ताने महेश मांजरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बिग बॉसच्या आगामी सिझन विषयी वक्तव्य केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या सिझनमध्ये काही खास पाहुण्यांना बोलवण्याचा विचार केल्याचे सांगितले.

बिग बॉस मराठीमध्ये खास पाहुणा म्हणून गेले दोन सिझन बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी सलमान खानला गेल्या दोन सिझनपासून विशेष अतिथी म्हणून बोलवत आहे आणि तो माझ्या विनंतीचा मान ठेवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. पण यंदा मी काही खास लोकांना बोलवण्याचा विचार केला आहे. आपल्या राज्यात अनेक प्रतिभावान व्यक्ती आहेत. मला वाटते की मराठीमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना या शोमध्ये आमंत्रित करणे चांगले ठरले’ असे महेश मांजरेकर म्हणाले.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? या नवांची आहे चर्चा

पुढे महेश मांजरेकर यांनी, “मला राज ठाकरे यांना या पर्वामध्ये विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करायला आवडेल. ते या शोसाठी अगदी उत्तम निवड ठरतील,” असे मत व्यक्त केले. इतकच नाही तर महेश मांजरेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत ते सुद्धा या पर्वामध्ये विशेष अतिथी म्हणून येऊ शकतात असे म्हणत चाहत्यांची उत्सुकता वाढवलीय. आता मांजरेकर हे कसे जुळवून आणतात किंवा ही केवळ चर्चाच राहते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण बिग बॉससारख्या लोकप्रिय मालिकेमध्ये राज ठाकरे आणि नितीन गडकरींसारखे मोठे नेते सहभागी झाल्यास चाहत्यांना एक वेगळीच पर्वणी ठरेल हे मात्र नक्की.