बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयने मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली.

एखादी चांगली पटकथा मिळाली की मराठी चित्रपटात भूमिका नक्की साकारेन, असं अक्षय म्हणाला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांचा मी खूप मोठा चाहता असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. ‘मला ‘बालक पालक’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपट खूप आवडले. दिवंगत दादा कोंडके यांच्या चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला.’ असं तो म्हणाला.

“चुंबक’चा प्रस्तुतकर्ता म्हणून मला यातून नफा कमवायचा नाही. मराठी चित्रपटांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे आणि मराठी चित्रपट आपल्या कक्षा अधिक रुंदावतो आहे. जर मी ठरवलं असतं तर मी ‘रावडी राठोड २’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली असती. पण मी ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट निवडले कारण मला महिलांना दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात त्या लोकांसमोर आणायच्या होत्या,’ असं तो प्रामाणिकपणे सांगतो.

‘चुंबक’ हा चित्रपट २७ जुलै रोजी महाराष्ट्रातील तब्बल ३०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्वानंद किरकिरे आणि दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.