आपल्या चाहत्यांनी आपल्यावर कायम खूश राहावे आणि आपली पडद्यावरची सुपरस्टार प्रतिमा अधिकाधिक उंच जात राहावी यासाठी काय वाट्टेल ते करायला सुपरस्टार तयार असतोच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुपरस्टार सलमान खानचा ‘जय हो’ हा चित्रपट. सलमान खानच्या चाहत्यांना पाहायला आवडेल ते सगळे या चित्रपटात आहे. परंतु, तरीसुद्धा सलमान चाहत्यांना त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा कमअस्सल, य:कश्चित आणि कंटाळवाणा वाटणारा हा चित्रपट आहे हे नक्की.
बॉलीवूडच्या सुपरस्टारचा करिश्मा अबाधित राहील असा चित्रपट बनवायचा आणि पैसा वसूल करायचा हा निर्माता-दिग्दर्शक आणि स्वत: सुपरस्टारचा हेतू असला तरी बिनडोक मनोरंजन आणि तुफान मारधाड करतानाही कथा-पटकथा-संवाद, गाणी, नेत्रसुखद चित्रण, उत्तमोत्तम निसर्गरम्य ठिकाणांचे दर्शन हे सारे काही त्याबरोबर दाखविता येते आणि सलमानच्या चाहत्यांबरोबरच अन्य प्रेक्षकांनाही किमान करमणुकीचा आनंद देता येऊ शकतो. परंतु, हे सलमानचे निर्माते-दिग्दर्शक-लेखक-छायालेखक यांना माहितीच नसावे. एका तेलुगू गाजलेल्या चित्रपटाचा (आणि हा तेलुगू चित्रपटही एका हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक) रिमेक हिंदीत करताना भयंकर पद्धतीने दाक्षिणी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल करण्याचा ‘जय हो’ प्रयत्न म्हणजे ‘भय हो’ म्हणण्याची वेळ प्रेक्षकांवर आणतो.
जय अग्निहोत्री हा म्हणे एक लष्करातला माजी अधिकारी आहे. लष्करातून त्याला निलंबित करण्यात आले आहे. परंतु, सीमेवर लढून नाही तर निदान गेला बाजार घरी राहून तरी खलप्रवृत्तींचा नायनाट करण्याची मक्तेदारी घेण्याचा त्याला निखळ छंद आहे बरे. या त्याच्या छंदापायी अन्यायग्रस्त जनता, त्याचे सगेसोयरे सगळे अगदी बिनधास्त असतात. त्याला एक गीता नावाची बहीण आहे, पण तिने प्रेमविवाह केलाय म्हणून जयच्या आईला ती आवडत नाही. जयला एक ७-८ वर्षांचा अतिशय आगाऊ असा भाचा पण आहे. तो सांगेल ते करायला अर्थातच सलमान मामू कायम तयार असतो. तो एकदा आपल्या शिक्षिकेने सांगितले म्हणून जय मामूला मदत करायला आपल्या शाळेत बोलावतो. एका अपंग मुलीला परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी मदत करायला सांगतो. जगभरातल्या जनतेला मदत करून एक प्रकारे ‘देशसेवा?’ वगैरे करण्याचा छंदच जय अग्निहोत्रीला असल्यामुळे जय अपंग मुलीला मदत करतो. असे मदत करण्याचे दोन-तीन प्रसंग चित्रपटात आहेत. अन्याय करणाऱ्या मंत्री दशरथ सिंगच्या एका माणसाला धडा शिकविल्यानंतर हा मंत्री इरेला पेटतो. मग काय जय आणि दशरथ सिंगच्या हजारो लोकांना जय धडा शिकवितो. कथेत अजिबात नावीन्य नसले तरी नाही म्हणायला एक अनोखी संकल्पना मांडायचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आपल्याला कुणी मदत केली की आभार न मानता आपण आणखी तिघांना मदत करायची आणि तीन-तीनचा फॉम्र्युला सगळ्यांनी अवंलबिला तर मग जग कसे सुखी वगैरे होईल अशी ही कल्पना जय मांडतो. मग काय सलमानभायचे चाहते एकदम खूश. सलमानच्या संस्थेच्या नावाला अनुरूप अशा प्रकारची पटकथा बेतलेली आहे. आता सगळे जग सुंदर करायचे तर प्रत्येकाने ‘सहृदय’पणे गरजूंना मदत करण्याशिवाय पर्याय राहात नाही ना. त्यामुळे जयचा हा मदतीचा तीन-तीन फॉम्र्युला हा चित्रपटाचा विषय असला तरी हा फॉम्र्युला मान्य नसलेल्या खलनायकाला आणि त्याच्या पाचशे-हजारो गुंडांना आपल्या एका ठोशाने गारद करण्याचाही जयला छंद आहेच. त्यामुळे पडद्यावर असे सगळे चालले असताना मध्येच एक बिनडोक नायिका कशाला येते आणि असंख्य गाण्यांचा भडिमार प्रेक्षकाला सहन करावा लागतो.  
सलमानच्या चाहत्यांना गाणी, मारधाड या खास सलमान स्टाईलच्या चित्रपटाच्या बाबतीत निराश करणारा हा चित्रपट ठरतो. जय अग्निहोत्री ही प्रमुख व्यक्तिरेखा सोडली तर तब्बू, डॅनी, महेश मांजरेकर, मोहनीश बहल, वरुण बडोला, अश्मित पटेल, रेशम टिपणीस, मुकुल देव, जेनेलिया डिसूझा अशी तगडी कलावंत मंडळी असूनही कुणाच्याही व्यक्तिरेखेला काहीही महत्त्व नाही. जय सोडला तर सर्व व्यक्तिरेखांना पाच-सहा संवादांपेक्षा पडद्यावर अधिक वाव देण्यात आलेला नाही. तब्बूसारख्या अभिनेत्रीने हा चित्रपट का केला, हा प्रश्न मात्र प्रेक्षकाला पडतो. सलमानच्या कारकिर्दीतील हा सर्वात वाईट चित्रपट म्हणता येईल. किंबहुना सलमानचे गेल्या काही वर्षांत आलेले चित्रपट उलटय़ा क्रमाने चांगले होते असेही सलमानच्या चाहत्यांना नक्कीच वाटेल.