डोंबिवलीसारख्या उपनगरात राहणारी एक सामान्य मुलगी. रोजच्या रोज ‘डोंबिवली फास्ट’ पकडून प्रवास करणाऱ्या या मुलीची ट्रेन कधीतरी नाच-गाणे शिकता शिकता दक्षिणेकडे वळली. दक्षिणेत तिला भेटला पश्चिमेकडचा ‘वीर’ राजकुमार. त्याने म्हणे तिला विचारले तिकडे माझ्या बॉलिवूड नगरीत काम करशील का? तर दक्षिणेत रमलेल्या त्या अल्लड मुलीने चक्क नाही म्हटले. आणि मग अरेरे.. मी त्याला नाही म्हटले हा विचार तिला सलत राहिला. तिला वाटले आता काही आपल्याला इथून बाहेर पडता यायचे नाही पण, बॉलिवूड नगरीच्या त्या ‘बीईंग ह्युमन’ राजकुमाराने हिला घेऊन जायचे मनावरच घेतले होते. त्याने पुन्हा तिच्यासाठी तिकीट पाठवून दिले आणि ‘जय हो’ म्हणत ती धावत सुटली ती थेट इथेच येऊन धडकली.
आता ही गोष्ट सलमानच्या चित्रपटात शोभून दिसेल की नाही हे माहित नाही. पण, अशी गोष्ट तोच करू शकतो हे मात्र कोणीही सांगू शकेल. त्या डोंबिवलीकर कन्येचं नाव जिने आज ‘सलमान’ कृपेमुळे बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आहे ती म्हणजे डेझी शाह. सलमानच्या नव्या चित्रपटाची नवी नायिका. डेझीची ही मुलाखत वाचण्याआधीच ‘जय हो’चा निकाल लागलेला आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून ती किती लांबचा पल्ला गाठेल हे माहिती नाही पण, अभिनेत्री होण्यासाठी मी फार कमी वेळात मोठी मजल मारली आहे हे मात्र ती आपल्या गप्पांमधून जाणवून देते.
सलमानच्या प्रत्येक चित्रपटाबरोबर त्याची नायिका कोण असणार याची चर्चा सुरू होते. ‘जय हो’च्या बाबतीतही हेच झाले होते. यात सलमानबरोबर रोमान्स कोण करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अगदी ‘बिग बॉस’च्या मागच्या पर्वात भाव खाऊन गेलेल्या सना खानपासून बॉलिवूडच्या आताच्या आघाडीच्या प्रत्येक अभिनेत्रीचे नाव या चित्रपटाशी जोडले गेले होते. अखेरीस या सगळ्यांना मागे टाकून बाजी मारली ती ‘डेझी शाह’ने. पण, इथेही त्याने शोध लावलेल्या प्रत्येक नायिकेप्रमाणे डेझीही त्याला कुठे भेटली?, हा प्रश्न आपल्याला छळत राहतो.
बॅक स्टेज डान्सर ते गणेश आचार्यची सहाय्यक कोरिओग्राफर असा पल्ला गाठलेल्या डेझीने या आधी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातूनच एका कार्यक्रमादरम्यान दुबईत तिची सलमानशी भेट झाली आणि त्याला तिच्यात एका भावी अभिनेत्रीची चुणूक जाणवली. त्यानंतर काही महिन्यात तिला सलमानबरोबर एका चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली होती. पण तेव्हा तिने तो चित्रपट नाकारला. आज त्याबद्दल बोलताना ती म्हणते, ‘मी ती भूमिका नाकारली याचं मला वाईट वाटत नव्हतं. पण, मी सलमान खान या माणसाला नाकारलं ही गोष्ट मात्र माझ्या मनाला लागून राहिली होती. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मी चुकवली आहे. पुन्हा कदाचित मला ही संधी मिळणार नाही असं वाटत असतानाच ‘जय हो’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि यावेळेस मात्र मागचापुढचा कोणताही विचार न करता मी सरळ हो म्हटलं’, असे डेझी सांगते.
  ‘जय हो’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना डेझी म्हणते की, ‘या चित्रपटात माझी भूमिका ही गर्ल नेक्स्ट डोअर प्रकारातील आहे. ही एक अल्लड मुलगी आहे. ती जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा वातावरणात एकप्रकारची प्रसन्नता आणते. खूप सकारात्मक दृष्टीकोन असलेली व्यक्तिरेखा मी रंगवली आहे’. या चित्रपटात सबकुछ सलमान असला तरी त्याची नायिका म्हणून डेझीच्या वाटय़ालाही चांगली भूमिका आली आहे. त्यामुळे त्याचा विषय निघताच ती भरभरून बोलत राहते. ‘सलमानबरोबर काम करणं म्हणजे रोज काही नवीन शिकण्याचा अनुभव असतो. तो समोरच्याला समजून घेतो, त्याच्या कलाने घेण्याचा प्रयत्न करतो. तो फक्त स्वतच्या कामात गुंतून राहत नाही तर इतरांच्या कामाकडेही पुरेसं लक्ष देतो. आज तो इतरांना मार्गदर्शन करू शकेल एवढा अनुभवी आहे आणि तेवढी धमकही बाळगून आहे. त्यामुळे प्रत्येक नविन कलाकारांना मदत करण्यासाठी तो धडपडत असतो, असे डेझीने सांगितले. सलमानने आपल्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट मग तो त्याचा सल्ला असेल किंवा त्याने देऊ केलेली संधी समोरच्यासाठी महत्वाचीच असते. सलमानचा नि:स्वार्थीपणा आणि त्याचा हळवा स्वभाव आपल्याला जास्त भावतो, असे ती म्हणते.
डेझीची ‘डोंबिवली फास्ट’
डेझीचं शालेय शिक्षण डोंबिवलीत झालं आहे. त्यामुळे तिची गणना डोंबिवलीकरांमध्ये होते याचा तिलाही आनंद आहे. ‘डोंबिवलीशी माझा संबंध फक्त शाळेपुरता आला. वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही डोंबिवलीत रहायला आलो. पण, डोंबिवली हे एक सांस्कृतिक केंद्र आहे. विविध संस्कृतीचे लोक इथे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात’, असं सांगणाऱ्या डेझीला डोंबिवलीत राहण्याचा सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे तिला उत्तम मराठी बोलता येते. म्हणजे, सलमानची ही नायिका बॉलिवूडमध्ये फारकाळ नाही टिकली तर हाच ‘डोंबिवली फास्ट’चा धागा पकडून ती मराठी चित्रपटसृष्टीत येऊ शकते नाही का!