कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच एक आगळे-वेगळे नाते निर्माण झालेले असते. सध्या सोशल मीडियामुळे या नात्यांचे स्वरुप आणखी बदलले असून कोणत्या कलाकाराने केलेले ट्विट चांगलेच गाजते. त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यामुळे झालेले वादळ यांचा नवा अध्यायच जणू सुरु झाला आहे. रविवारी सुरु असलेली आयसीसी वुमन्स वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय महिला संघ लॉर्डस येथे गेला आहे.

भारताने याआधीच्या सामन्यात इंग्लंडला हरविले आहे. या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहीत शर्मा, शिखर धवन यांसोबतच अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनीही महिला संघाला शुभेच्छा दिल्या. मात्र ऋषी कपूर यांनी केलेल्या एका ट्विटमुळे वादाला तोंड फुटले आहे.

लॉर्डस मैदानावर क्रिकेटपटू सौरव गांगूलीच्या २००२ मध्ये झालेल्या त्या कृतीची पुनरावृत्ती होईल याचा संपूर्ण भारत देश वाट पाहात आहे. २००२ मध्ये झालेल्या सामन्यादरम्यान गांगुलीने सामना जिंकल्यावर अंगातील टीशर्ट काढून तो हातात घेऊन फिरवून आनंद व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटू करतील असा ऋषी कपूर यांच्या ट्विटचा अर्थ होतो.

त्यामुळे त्यांचे हे विधान त्यांचे चाहते आणि क्रिकेटचे चाहते यांना अजिबात पटलेले नाही. त्यामुळे नेटीझन्सची ते चांगलीच शिकार झाले आहेत आणि त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध नोंदविला गेला आहे.