चौदाव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाने भारतातीलच नव्हे तर आशियाई देशांमधील अन्य महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या चौदाव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यंदा सुमारे ६० हून अधिक चित्रपट व लघुपट रसिकांना पहायला मिळाले. महोत्सवाचा समारोप इजिप्तच्या ‘केरिओ टाईम’ या चित्रपटाने झाला.
यंदाच्या लघुपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या  नव्या पद्धतीची मांडणी करणारे लघुपट रसिकांना पहायला मिळाले. इराणचा ‘आईस वॉटर’ हा लघुपट यंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असून स्पेशल ज्युरी अवॉर्ड ‘ब्रोकन इमेज’ या कन्नड चित्रपटाला मिळाला. नव्या गुणवंत दिग्दर्शकांनी बनवलेल्या लघुपटांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या लघुपट स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रंगलेल्या या महोत्सवात अभिनय क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सन्मानित करण्यात आले. या महोत्सवाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.