अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लीक टिव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने रस्त्यावर येऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अनेक राज्यस्तरीय आणि केंद्रातील नेते अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याचे म्हणत आहेत. न्यायालयाकडूनही गोस्वामी यांना दिलासा मिळालेला नाही, पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. दरम्यान, अभिनेता कमाल आर खानने ट्विट करत अर्णब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने ट्विटमध्ये ‘जर अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये निघून जावे’ असे म्हटले आहे.

स्वयंमघोषीत चित्रपट समीक्षक कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट हे चर्चेचा विषय असते. नुकताच त्याने ट्विट करत अर्णब गोस्वामी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘जर अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये जायला हवे’ या अशायचे ट्विट कमाल आर खानने केले आहे.

पुढे त्याने आणखी एक ट्विट केले आहे. ‘माझ्या जीवाला धोका आहे असे त्याने (अर्णब) बोलायला नको होते. त्याने देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा होता. तो नेहमी म्हणायचा की कोणाला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये निघून जावे. आज तो स्वत: घाबरला आहे? का?’ या आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

मूळ प्रकरणावर एक नजर…

मूळच्या अलिबागमधील कावीर येथील अन्वय नाईक यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ते ४ मे २०१८ रोजी कावीर येथील निवासस्थानी आले होते. दुसऱ्याच दिवशी (५ मे) अन्वय यांच्यासह आई कुमूद यांचा मृतदेह नोकरांना घरात आढळला. पोलिसांना तिथे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. अर्णब गोस्वामी, ‘आयकास्ट स्काय मीडिया’चे फिरोज शेख, ‘स्मार्टवर्क्‍स’चे नीतेश सारडा या तिघांनी पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी या चिठ्ठीत नमूद केले होते.

त्यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासात काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर तपास बंद करण्यात आला. मात्र या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची विनंती अन्वय यांची पत्नी आणि मुलीने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या फेरतपासाचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.