पॉर्न जगतातून बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करते आहे. बंगळुरु येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी सध्या तिचा विरोध केला जात असून, वर्षअखेरीस होणाऱ्या तिच्या कार्यक्रमावर कन्नड समर्थकांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. सनीचा कार्यक्रम हा भारतीय संस्कृतीसाठी घातक असल्याचे मत या संघटनेतर्फे मांडण्यात आले आहे.

गुरुवारपासूनच सनीच्या या कार्यक्रमाविषयी अनेकांनी विरोध केल्याचे पाहायला मिळते आहे. ३१ डिसेंबरला बंगळुरुमध्ये सनीचा कार्यक्रम झाला तर, मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन आत्महत्या करतील असा इशारा‘कन्नड रक्षक वेदिके युवा सेने’च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. सनीचा कार्यक्रम संस्कृतीच्या दृष्टीने घातक असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी तिने साडी नेसून परफॉर्म केले तर त्याला आमचा विरोध नसेल, असेही म्हटले आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

त्याविषयीच एका कार्यकर्त्याने, या कार्यक्रमाला विरोध करण्यामागचे कारणही स्पष्ट केले. ‘सनी लिओनीच्या तोकड्या कपड्यांचा आम्ही विरोध करतो. त्याऐवजीच तिने जर साडी नेसून परफॉर्मन्स केला तर आम्हीही तो कार्यक्रम पाहू. सध्या जरी सनी एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरीही तिच्या भूतकाळाविषयी आपले चांगले मत नसून अशा व्यक्तींना आम्ही कधीच प्रोत्साहन देणार नाही’, असे मत त्या कार्यकर्त्याने मांडल्याचे वृत्त स्पॉटबॉय ईने प्रसिद्ध केले आहे. तेव्हा आता नववर्षाच्या पूर्वसंध्येला सनीचा हा कार्यक्रम पार पडणार, की कार्यकर्त्यांच्या दबावामुळे कार्यक्रम रद्द होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.