अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. संधी मिळाल्यास मला पाकिस्तानी चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल, असे प्रियांकाने सांगितले. दरम्यान, प्रियांका आगामी काळात रिमा कागती दिग्दर्शित ‘मि. चालू’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खानबरोबर दिसणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत फवाद खानबोरबरच पदार्पण करणार का, असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांकाने सांगितले की, मी नायक पाहून चित्रपटांची निवड करत नाही. चित्रपटाची कथा आणि माझी भूमिका चांगली असली पाहिजे. मी मनोरंजनासाठी चित्रपट करते, मी एक कलाकार आहे, त्यामुळे मला चांगले चित्रपट करायला आवडतात, असे प्रियांकाने सांगितले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांतील कलाकार काही करू शकतात का, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांकाने ही कलाकारांची नव्हे तर दोन्ही देशांच्या सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले. कलाकारांच्या खांद्यावर ही जबाबदारी देणे खूप अवघड आहे. ही सरकारची समस्या आहे. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कलाकार फक्त दोन देशांना एकत्र आणू शकतात. दोन्ही देशांतील संबंध सुधारणे ही नागरिक म्हणून आमची आणि सरकारची जबाबदारी आहे. कलाकार जे काही करतात ते कलेसाठी असते, कला ही सर्व जगात जाते, असे प्रियांकाने सांगितले.