ऑनलाइन व्हिडीओ प्लॅटफॉर्म हे सध्याचे प्रभावी माध्यम समजले जाते. त्यातही वेब सीरिजचं विश्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेब सीरिजच्या सेन्सॉरशिपचाही मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या मुद्द्यावर ‘सेक्रेड गेम्स’चा अभिनेता पंकज त्रिपाठी याने त्याचं मत मांडलं आहे. या बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत पंकजने सीरिजमधल्या न्यूडिटी व आक्षेपार्ह संवाद, दृश्यांवर भाष्य केलं. एखाद्याला न्यूडिटीच पाहायची असेल तर त्या व्यक्तीकडे पॉर्नोग्राफीचा पर्याय आहे, मग असा माणूस वेब सीरिजकडे का वळेल, असं वक्तव्य पंकजने केलं.

“प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं असं मला वाटतं. जर एखाद्या दृश्यावर कात्री चालवल्याने त्या कथेला काही अर्थ राहत नसेल तर मग हा विचाराचा मुद्दा आहे. विक्रमादित्य मोटवाने, अनुराग कश्यप हे जबाबदार व्यक्ती आहेत. वाद किंवा चर्चा घडवून आणण्यासाठी ते उगाचच एखादा सीन त्यात समाविष्ट करणार नाही. पॉर्नोग्राफी इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. मग लोकांना न्यूडिटीच पाहायची असेल तर ते वेब सीरिजच का बघतील,” असा प्रश्न त्याने उपस्थित केला.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्‍या घरात का होतेय किंग खानची चर्चा?

‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिजसुद्धा हिंसक आणि अश्लील दृश्यांमुळे चर्चेत होती. यावेळी भारतातील डिजीटल कंटेटवर सेन्सॉरशिप आणण्याच्या मुद्द्यावरही पंकजने त्याचं मत मांडलं. “आपल्या कथेत कोणती गोष्ट किती प्रमाणात हवी हे एका जबाबदार दिग्दर्शक, निर्मात्याला माहीत असतं. सेन्सॉरशिपऐवजी प्रमाणपत्राची व्यवस्था हवी जेणेकरून विविध वयोगटासाठी वर्गीकरण करण्यास मदत होईल,” असं पंकज म्हणाला.

पंकज ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये आध्यात्मिक गुरूची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबाबत त्याने सांगितलं, “त्या भावना सहज येणाऱ्या नसतात म्हणून माझी भूमिका मला थोडी कठीण वाटली. मी कधीच अध्यात्मिक गुरू नव्हतो आणि अशा गुरूजींसोबत मी कधी वेळसुद्धा घालवलेला नव्हता. त्याचप्रमाणे कोणत्याही गुरूजींना मी ओळखतही नव्हतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे एक आव्हान होतं. प्रत्येक कलाकार त्याला मिळालेल्या नव्या भूमिकेतून नवीन गोष्टी शिकत असतो. मलाही खूप काही शिकायला मिळालं.”

Video : ‘तेरी बन जाऊंगी’ अल्बममध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज

येत्या १५ ऑगस्ट रोजी हा दुसरा सिझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझननंतर आता प्रेक्षकांना या सिझनची फार उत्कंठा आहे. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.