अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू होऊन आता जवळपास ४८ तासांहून अधिक तास लोटले आहेत. पण, त्यांचा मृतदेह अद्यापही भारतात आणण्यात आलेला नाही. सध्याच्या घडीला श्रीदेवी यांच्या मृत्युची चौकशी दुबई सार्वजनिक फिर्याद विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे. दरम्यान दुबईच्या कायदेशीर विभागाकडून आलेल्या माहितीनुसार गरज वाटल्यास श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे पुन्हा शववविच्छेदन करण्यात येणार असल्याचं वृत्त ‘नवभारत टाईम्स’ने प्रसिद्ध केलं आहे.

श्रीदेवी यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला नसून बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात म्हटलं गेलं. त्यानंतर या सर्व प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. या अहवालानंतर ज्या हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या तेथील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी पाहिले आहे. त्याशिवाय श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

वाचा : बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग

शनिवारी रात्री अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर कार्डिअॅक अरेट्समुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. पण, फॉरेन्सिक अहवालानंतर या प्रकरणाला मिळालेलं वळण पाहता आता दुबई पोलिस या घटनेशी संबंधित सर्व धागेदोरे शोधत असून नेमक्या त्या बाथटबमध्ये पडल्या कशा याचाच शोध घेत आहेत. एमिरट्स टॉवरच्या खोली क्रमांक २२०१ मध्ये श्रीदेवी यांचा मृतदेह आढळला होता. ‘खलिज टाईम्स’च्या वृत्तानुसार रविवारपासूनच या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी दिलेल्या माहितीमुसार दुबई पोलिस आणि आणखी एका विभागाची संमती मिळाल्यानंतरच श्रीदेवी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.