कंगना रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर वाचा फो़डल्यानंतर आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आपली मतं मांडली. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात करण जोहर, सैफ अली खान आणि वरूण धवनने कंगनाला कोपरखळीही मारली. त्यानंतर तिघांनीही तिची माफी मागितली. मात्र हा मुद्दा इथेच संपत नाही. सैफने शुक्रवारी एक खुलं पत्र लिहून या सर्व वादाला सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांशी जोडलं. या सर्व प्रकरणावर कंगनाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर तिनंही मौन सोडलं आणि सैफच्या पत्राचं प्रत्युत्तर म्हणून कंगनानंही एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं.

‘मि़ड डे’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या पत्राच्या सुरुवातीला कंगना म्हणते की, ‘गेल्या काही दिवसांपासून घराणेशाहीवर खूप काही चर्चा झाली आणि ही सकारात्मक होती. यातील काही मुद्दे मला पटले तर काही मुद्दे ऐकून माझी निराशा झाली. एका पत्राने माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि सैफ अली खानचं हे पत्र सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होतंय. घराणेशाहीच्या मुद्दयावर मी जेव्हा करण जोहरचा ब्लॉग वाचला होता तेव्हाही मी निराश झाले होते. इतकंच नाही तर एका मुलाखतीत चित्रपट व्यवसायात यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या निकषांबद्दल करण बोलला आणि त्यात प्रतिभेचा कुठेच उल्लेख नव्हता.’

पत्रात ती पुढे म्हणते की, ‘सैफने त्याच्या पत्रात लिहिलं की मी कंगनाची माफी मागितली आणि आता कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मात्र हा विषय केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही. घराणेशाही हा एक असा मुद्दा आहे ज्यामध्ये लोक बौद्धिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा तात्पुरत्या मानवी भावनांवर जास्त लक्ष देतात. एखादा व्यवसाय मूल्यांवर न करता भावनांच्या आधारे केला तर तो कदाचित यशस्वीही ठरेल मात्र तो व्यवसाय दीर्घकाळ चालू शकणार नाही. शिवाय देशातल्या १.३ अब्जाहून अधिक लोकांच्या खऱ्या क्षमतेवर तो अडथळा ठरतो.’ या पत्रात तिने विवेकानंद, आईनस्टाईन आणि शेक्सपिअर यांचीही उदाहरणे दिली.

वाचा : घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये प्रसारमाध्यमेच अग्रेसर- सैफ

सैफने आपल्या पत्रात स्टार किड्सच्या आनुवंशिकतेवरही भाष्य केलं होतं. याचे उत्तर देत कंगना म्हणाली की, ‘आनुवंशिकतेचा अभ्यास करण्यातच मी माझ्या जीवनाचा एक भाग व्यतित केला. मात्र मला हेच समजलं नाही की तुम्ही हायब्रिड शर्यतीच्या घोड्यांची तुलना कलाकारांशी कशाप्रकारे केली? मेहनत, अनुभव, एकाग्रता, उत्साह, शिस्त, प्रेम, जाणून घेण्याची उत्सुकता यांसारख्या गोष्टी कुटुंबातील जीन्सच्या माध्यमातून कसे मिळतात हे तुम्हाला सिद्ध करायचे आहे का? जर तुमचा हा मुद्दा योग्य असेल तर मग मला शेतकरी व्हायला पाहिजे होतं.’

वाचा : ‘नेपोटिझम रॉक्स’ म्हणणाऱ्या करणने मागितली कंगनाची माफी

सैफने आपल्या पत्रातून घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये प्रसारमाध्यमेच अग्रेसर असल्याचा आरोप केला होता. याचा विरोध करत कंगनाने उत्तर दिले की, ‘प्रसारमाध्यमांवर खापर फोडण्याच्या तुमच्या वक्तव्यात तथ्य नाही. घराणेशाही ही मानवी स्वभावातील एक उणीव आहे. याचा लढा देण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि ताकदीची गरज आहे. यात कधी आपण जिंकतो तर कधी नाही.’