मला जर कुणी घाटी म्हटलं तर मी त्याचं थोबाड फोडेन असं अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे. “आजवर मला कधी कुणी घाटी म्हटलेलं नाही. मात्र जर म्हणालं त्या माणसाचं मी थोबाड फोडेन. हिंदी मालिका आणि चित्रपट विश्वात मराठी कलाकारांना आदर देतात, जेवण व्यवस्थित असतं. मात्र पैशांच्या बाबतीत या लोकांचा हात आखडता घेतो. मला जर कलाकारांमध्ये भेदभाव करत आहेत असं जाणवलं तर मी कधी निघून गेले कुणाला कळणारही नाही असंही उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे. गुणवत्ता असूनही पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत त्यांनी बोलून दाखवली. एवढंच नाही तर घाटी असं कुणी संबोधलं तर मी त्या व्यक्तीचं थोबाडच फोडेन” असंही उषा नाडकर्णी म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मराठी कलाकारांना घाटी असं संबोधलं जायचं असं वक्तव्य केलं होतं. तसंच नेपोटिझम हा हिंदी सिनेसृष्टीत चंद्र सूर्या इतकाच लख्ख आहे असं त्यांनी म्हणाल्या होत्या. एक काळ असा होता की ज्या काळात मराठी कलाकारांना हिंदी सिनेसृष्टीत फारशी बरी वागणूक मिळत नसे असंही त्या म्हणाल्या होत्या. नेमक्या याच मुद्द्यावर उषा नाडकर्णी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अद्याप तरी कुणीही आपल्याला असं म्हणालेलं नाही. मराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो मात्र आपल्याला कुणी असं म्हणालं तर मात्र मी त्या व्यक्तीचं थोबाड फोडेन अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी उषा नाडकर्णी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केलं. “सुशांत सिंह राजपूत गेल्याची बातमी मला माझ्या हेअर ड्रेसरने फोन करुन सांगितली. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही, खूप चांगला मुलगा होता. त्याच्याबाबतीत जे काही घडलं ते अस्वस्थ करणारं आहे आणि मनाला चटका लावणारंही आहे” असंही त्या म्हणाल्या.