गोव्यामध्ये आयोजित इफ्फी २०१७ सोहळ्याला आजपासून सुरूवात झाली. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली. या महोत्सवात पद्मावती सिनेमावर सुरू असलेल्या वादावरही भाष्य करण्यात आले. ४८ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाचे उद्घाटन शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले.

या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला कतरिना कैफ, शाहिद कपूर, विशाल भारद्वाज आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन शाहरुखच्या हस्ते करण्यात आले तर सांगता सलमान खानच्या हस्ते करण्यात येणार आहे.

प्रसून जोशी यांनी पद्मावती वादाबद्दल बोलताना म्हटले की, ‘यावेळी विवादापेक्षा चर्चेची जास्त गरज आहे.’ तर शाहिद कपूर म्हणाला की, ‘आपले संविधान म्हटले आहे की, जोवर तुम्ही दोषी आहात हे सिद्ध होत नाही तोवर तुम्ही निर्दोषच असता. हीच गोष्ट पद्मावती सिनेमाच्या बाबतीतही लागू होते. या सिनेमात दाखवलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत हे तोवर सिद्ध होणार नाही जोवर हा सिनेमा प्रेक्षक पाहणार नाही. सिनेमात काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत असे वाटत नाही. पद्मावती सिनेमा काही झाले तरी प्रदर्शित होणारच.’

संजय लीला भन्साळी यांच्यासोबत विशाल भारद्वाज प्रत्येक प्रसंगात उभे राहतील असे ते म्हणाले. याशिवाय प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान याने पद्मावती वादावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.