केरळ उच्च न्यायालयाने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’च्या आयोजकांना ‘एस. दुर्गा’ या मल्याळम सिनेमाचे महोत्सवात चित्रीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. ‘एस दुर्गा’ आणि रवी जाधव याचा ‘न्यूड’ या सिनेमांना कोणतीही पूर्वसुचना न देता महोत्सवातून वगळण्यात आले होते. परीक्षकांनी या दोन्ही सिनेमांना हिरवा कंदील देऊनही हे दोन्ही सिनेमे महोत्सवात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दोन सिनेमे वगळण्यात आल्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयावर जोरदार टीकाही करण्यात आली होती.

‘एस दुर्गा’ सिनेमाचे महोत्सवात चित्रीकरण केल्यास लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, हे कारण माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले. तसेच या सिनेमाची निवड झाली तेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केला नव्हता.

पण आता ‘सीएफसी’ने या सिनेमाला प्रमाणपत्र दिल्याने इफ्फीमध्ये ‘एस दुर्गा’ हा सिनेमा दाखवला जाऊ शकतो, असे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले. सनल कुमार शशीधर दिग्दर्शित ‘एस दुर्गा’ सिनेमाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इफ्फीविरोधात १५ नोव्हेंबरला केरळ उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतलेला आक्षेप हा तर्कहीन आणि निराधार असल्याचे शशीधरन यांनी म्हटले आहे. या सिनेमाचे आधी नाव ‘सेक्सी दुर्गा’ असे ठेवण्यात आले होते. पण याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर या सिनेमाचे नाव ‘एस दुर्गा’ असे ठेवले गेले. तसेच सेन्सॉर बोर्डानेही या सिनेमाला यु/ए प्रमाणपत्र दिले होते. या सिनेमात आक्षेपार्ह असा कोणताच मुद्दा नव्हता तरी ‘इफ्फी’ने हा सिनेमा महोत्सवात प्रदर्शित करण्याला मनाई केली होती,’ असे शशीधरन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.