19 December 2018

News Flash

‘कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’; पाहा ‘न्यूड’चा टीझर

दुर्लक्षित कथानकाचा ठाव घेतोय रवी जाधवचा हा चित्रपट

न्यूड

‘इफ्फी’च्या यादीतून नाव वगळण्यात आलेल्या ‘न्यूड’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या पोस्टरने अनेकांचेच लक्ष वेधले होते. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली. पण, ‘इफ्फी’च्या यादीतून या चित्रपटाला का वगळ्यात आले हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन ‘न्यूड’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

हा टीझर पोस्ट करत त्याने कॅप्शनमधून ‘इफ्फी’ प्रकरणावरही आपले मत मांडले. ‘ज्या चित्रपटावरुन इतका वाद सुरु आहे, त्या चित्रपटाचा हा टीझर’, असे म्हणत त्याने ‘न्यूड’ची छोटीशी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि मेघना जाधव यांची निर्मिती आणि रवी जाधवचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये बऱ्याच गोष्टी लक्ष वेधत आहेत. कलाकारांच्या अभिनयापासून ते अगदी कॅमेऱ्यात टिपलेल्या प्रत्येक क्षणापर्यंत सर्वच गोष्टींचे समीकरण सुरेखपणे जुळून आले आहे. टीझरमधील प्रत्येक दृश्य जीवाच्या आकांताने बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असल्याची अनुभूती झाल्यावाचून राहात नाही. त्यातही टीझरच्या शेवटी ज्येष्ठ अभिनेने नसिरुद्दीन शाह अनेकांनाच थक्क करुन जात आहेत.

‘बेटा…. कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’, हे वाक्य काळजाला भिडते. मुळात ते वाक्य म्हणणाऱ्या, एका चित्रकाराच्या भूमिकेत दिसणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचे संवाद पुन्हा पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडत आहेत. रवी जाधवचा हा आगामी चित्रपट २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरीही आतापासूनच चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून तो पुन्हा एकदा अनोख्या कथानकाला मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहे हे नक्की.

फोटो गॅलरी: लिसा- झॅकचे पहिलेवहिले फोटोशूट…

First Published on November 15, 2017 10:01 am

Web Title: iffi film director ravi jadhav shares marathi movie nude teaser