समस्त भारतीय चित्रपटसृष्टीला अमेरिकेत होणाऱ्या आयफा २०१४ पुरस्कार सोहळ्याचे वेध लागले आहेत. या सोहळ्याला शाहरूख खान, दीपिका पदुकोण, ह्रतिक रोशन, करिना कपूर, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, कल्की कोचलीन आणि बॉलीवूडमधील अन्य तारे-तारकांची उपस्थिती लागणार असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अमेरिकेतील ताम्पा बे येथे मंगळवारपासून सुरू होणारा आयफा सोहळा चार दिवस चालणार आहे. गोल्डन ग्लोब पुरस्काराचा विजेता आणि हॉलिवूड अभिनेता जॉन ट्रावोल्टा यावेळी उपस्थित राहणार असल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे. आयफा पुरस्कारांचा सोहळा पहिल्यांदाच पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. आयफाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिलला होणाऱ्या मुख्य सोहळ्यात बॉलीवूडचे तारे-तारका मनोरंजनाचा नजराणा पेश करणार आहेत. यावेळी करिना कपूर, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बसू हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर नृत्य सादर करणार असून संगीतकार प्रीतम आणि उस्ताद राहत फतेअलीखान काही गाणी सादर करणार आहेत.

आपल्या पेहरावासाठी प्रसिद्ध असणा-या सोनम कपूर, दीपिका पदुकोण, करिना कपूर आयफाच्या निमित्ताने कोणत्या वेशभुषेत अवतरणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. तसेच अमिताभ बच्चन, ह्रतिक रोशन, माधुरी दिक्षित यांच्यासारख्या बड्या ताऱ्यांची उपस्थिती आयफा सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.  
यावर्षी ‘भाग मिल्खा भाग’ फेम अभिनेता फरहान खान आणि शाहीद कपूर आयफा सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत.