‘आयफा २०१४’ पुरस्कार सोहळा आणखी एका वादात सापडला आहे. मुंबईत २४ एप्रिल ही लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर झाल्याने अमेरिकेत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या वेळापत्रकात अलीकडेच बदल करावा लागला होता. आता, आकर्श कोलाप्रथ या फ्लॉरिडास्थित ट्रॅव्हल एजन्टने विझक्राफ्टवर ७० लाख अमेरिकन डॉलर्सचा दावा ठोकला आहे. आकर्श कोलाप्रथने विझक्राफ्टविरुद्धा दाखल केलेल्या या दाव्यात विझक्राफटने विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी आकर्श कोलाप्रथने विझक्राफ्टच्या विराफ सरकारी आणि अंड्रे टिम्मिंसशी केलेल्या करारानुसार त्याने कंपनीच्या वित्तीय आयोजनासाठी मदत करणे आणि अमेरिकेत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी व्यवस्था सांभाळण्याचे ठरले होते, ज्यात कलाकारांच्या राहण्याच्या व्यवस्थेचादेखील समावेश होता. या संपूर्ण कालावधीत, कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी आणि प्रवासासाठी २,६५,००० अमेरिकन डॉलर खर्च केल्याचा कोलाप्रथचा दावा आहे. कोलाप्रथला कोणतेही योग्य कारण न देता सध्या विझक्राफटने स्वत:च बुकिंग करण्यास सुरुवात केल्याने कोलाप्रथच्या ‘७एम टुर्स’ला खूप मोठा तोटा सहन करावा लागला. भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे कार्यक्रमाच्या तारखांमध्ये बदल करावा लागला, त्यामुळे हॉटेल बुकिंग रद्द करावे लागल्याने आपल्या कंपनीला ४० लाख अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाल्याचा खुलासा कोलाप्रथने केला आहे. याशिवाय, त्याने अन्य काही आर्थिकबाबींचा उल्लेख केला आहे. विझक्राफटचा संचालक सबा जोसेफने कोलाप्रथचे दावे खोटे असल्याचे म्हणत आम्ही न्यायालयासमोर योग्य त्या प्रकारे याला उत्तर देऊ असे म्हटले आहे.