हिंदी चित्रपटसृष्टीसाठी कार्यरत असणाऱ्या अनेकांसाठीच मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यांविषयीच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा कुठे होणार इथपासून या सोहळ्यात कोणकोणत्या सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स पाहता येणार याविषयीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आयफा म्हटलं की कलाकारांची मांदियाळी आलीच. याच मांदियाळीत यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची जादूसुद्धा पाहता येणार आहे.

जवळपास २० वर्षांनंतर रेखा आयफाच्या व्यासपीठावर परफॉर्म करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठीच्या परफॉर्मन्सच्या यादीत रेखा यांच्याही नावाचा समावेश असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. इतकच नव्हे तर रेखा कधी एकदा त्यांच्या नजरेच्या एका बाणाने उपस्थितांना घायाळ करतात हेच पाहण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वांच्याच कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं आयफाचं हे १९ वं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याअंतर्गत जवळपास तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. २२ ते २४ जूनदरम्यान हे कार्यक्रम बँकॉक येथे पार पडतील. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता रितेस देशमुख यांच्या खांद्यावर असेल.

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना?

कलेचा गौरव होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात रेखा यांच्या परफॉर्मन्सशिवाय अभिनेता रणबीर कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, अर्जुन कपूर, कृती सेनॉन, लूलिया वंतूर यांचे परफॉर्मन्सही पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.