भारतीय सिंनेमाच्या शंभरीत रुपेरी पडद्यावरील अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, संगीत आणि दिग्दर्शक यांचा फार मोलाचा वाटा आहे. यांच्या अमुल्य योगदानाकरिता खास गाणे आणि नृत्य यंदाच्या मकाउ येथे साजरा करण्यात येणा-या १३ व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. आयफा सोहळ्याची सुऱुवात तांत्रिक विभागाच्या पुरस्काराच्या वितरणाने करण्यात आली. अनुराग बासूच्या ‘बर्फी’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि रंगभूषेसाठी पुरस्कार पटकाविला. यावर “स्क्रीनप्लेसाठी मिळणारा हा माझा दुसरा आयफा पुरस्कार असून तो मी माझ्या पत्नीस समर्पित करतो. मी सालीम-जावेद यांचे चित्रपट पाहून पटकथा लिहण्यास शिकलो”, असे लेखक-दिग्दर्शक बासू पुरस्कार स्वीकारताना म्हणाला.
हिंदी चित्रपटांतील विवाह सोहळ्यासाठी रचल्या गेलेल्या प्रसिद्ध गाण्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिनेत्री दिया मिर्झाने ‘मेहंदी लगाके रखना’, ‘चल प्यार करेगी’ आणि ‘तेनू लेके मे जावांगा’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यानंतर चित्रपटसृष्टीत नवीन पदार्पण केलेल्या अर्जुन कपूरने स्टंटबाची करत स्टेजवर तडफदार प्रवेश केला. या जोशपूर्ण नृत्यांनंतर संगीतकार प्रितम चक्रोवर्ती तसेच अरिजित सिंग, अदिती शर्मा आणि बेनी दयाल या गायकांनी ‘बत्तमीज दिल’, ‘कबीरा’ आणि ‘राबता’ यांसारखी गाणी सादर केली. सोफी चौधरीने हेलनपासून ते करीना कपूर यांच्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध आयटम सॉंगवर नृत्य केले.