18 October 2018

News Flash

‘या’ सिनेमातून पुन्हा एकत्र येणार शाहिद- इलियाना

हा सिनेमा आजच्या विषयांवर भाष्य करतो

शाहिद कपूर आणि इलियाना डिक्रुझ

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमात महाराजा रावल रतन सिंह ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर शाहिद कपूरने दुसरा सिनेमा स्वीकारला. ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमात तो दिसणार आहे. ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या सिनेमाचे दिग्दर्शक श्रीनारायण सिंह हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमात शाहिदसोबत कतरिना कैफ दिसेल अशी चर्चा होती. पण आता शाहिदसोबत इलियाना डिक्रूझ दिसेल हे जवळपास निश्चित झाले आहे. प्रेरणा सिंह आणि टी-सीरिज मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या एका मुलाखतीत निर्माती प्रेरणाने इलियानाच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. ‘आम्ही फक्त इलियानाशी या सिनेमाबद्दल बोललो आहोत. ती या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारताना दिसेल.’ सिनेमात शाहिद आणि इलियाना दोघंही वकील दाखवण्यात आले असून ते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण शाहिदची नायिका कोण असेल हे मात्र अजून कळू शकलेले नाही. यासाठी पुन्हा एकदा कतरिना कैफ आणि श्रद्धा कपूर यांच्याशी निर्मात्यांचे बोलणे सुरू आहे.

दिवाळीदरम्यान सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाबद्दल बोलताना श्रीनारायण म्हणाले की, ”बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा आजच्या विषयांवर भाष्य करतो. दिवाळीमध्ये या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्याचा मुख्य उद्देश हाच होता की, या दिवसांमध्ये संपूर्ण भारत दिव्यांनी उजळलेलं असतं. आम्हाला एका अशा सिनेमाची निर्मिती करायची आहे जो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर करेलच शिवाय समाजाला एक विचारही देऊ शकेल.’ हा सिनेमा पुढच्या वर्षी ३१ ऑगस्टला प्रदर्शित होईल. शाहिद आणि इलियानाने याआधीही ‘फटा पोस्टर निकला हीरो’ या सिनेमात एकत्र काम केले होते.

First Published on December 5, 2017 7:29 pm

Web Title: ileana dcruz finalised for the batti gul meter chalu opposite shahid kapoor