मी ड्रग अॅडिक्ट नाही आणि लेस्बियन तर मुळीच नाही असे म्हणत राखी सावंतचे सगळे आरोप तनुश्री दत्ताने फेटाळून लावले आहेत. मीटू या चळवळीद्वार अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्यावर दहा वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक गैरवर्तनाला वाचा फोडली. त्यानंतर अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांना आलेले अनुभव सांगितले. मीटू या मोहिमेमुळे नाना पाटेकर, आलोकनाथ, कैलाश खेर, पियुष मिश्रा, विकास बहल, साजिद खान अशा अनेकांची नावं पुढे आली. दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत अभिनेत्री राखी सावंतने तनुश्री दत्ता ड्रग अॅडिक्ट आणि समलिंगी असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर तनुश्रीने माझ्यावर बलात्कार केला असाही गंभीर आरोप राखी सावंतने केला होता.

मात्र या सगळ्या आरोपांना उत्तर देत अभिनेत्री तनुश्री दत्ताने हे आरोप फेटाळले आहेत. तसेच मी ड्रग अॅडिक्ट नाही आणि लेस्बियन तर मुळीच नाही असेही तिने म्हटले आहे. तनुश्री दत्ताने जेव्हापासून नाना पाटेकरांवर आरोप केले आहेत तेव्हापासून अभिनेत्री राखी सावंतने तनुश्री दत्तावर टीकाच केली आहे. तनुश्री दत्ता रेव्ह पार्ट्यांना जाते, तिथे ती ड्रग्ज घेते. दारू आणि ड्रग्जच्या नशेत तिने काय काय केले आहे तिला ठाऊक नाही असे अनेक आरोप राखी सावंतने केले आहेत. मात्र या सगळ्या आरोपांना काहीही अर्थ नसल्याचे तनुश्री दत्ताने म्हटले आहे.

राखी सावंतने केलेल्या गंभीर आरोपांबाबत जेव्हा तनुश्री दत्ताला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने हे सगळे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. मीटू ही महिलांची चळवळ आहे या चळवळीमुळे अनेक महिलांना वाचा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे धाडस मिळाले. आता राखी सावंतसारखे लोक या चळवळीचा जोक करत आहेत. ही बाब गैर आहे. मीटूसारख्या चळवळीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. उगाच मला विरोध करायचा आहे, माझे आरोप खोडून काढायचे आहेत म्हणून राखी सावंत बेताल वक्तव्यं करत असल्याचंही तनुश्री दत्ताने म्हटलं आहे.