७१ व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय या नेहमीप्रमाणेच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरल्या. मात्र यांच्या व्यतिरिक्त अन्य काही असेही बॉलिवूड कलाकार होते जे त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी चर्चेत आले. त्यातच सध्या मल्लिका शेरावतचं नाव घेतलं जात आहे. आपल्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाणारी मल्लिका यावेळी मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कान फेस्टिवलमधील एक व्हिडिओ शेअर करत तिने संपूर्ण समाजाला खास संदेश दिला आहे. तिच्या या नव्या कल्पनेमुळे अनेकांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे.

बॉलिवूडची ही बोल्ड अभिनेत्री गेल्याअनेक दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. मात्र सोशल अॅक्टिव्हिटिजमधून ती सक्रिय असल्याचे पहायला मिळते. ‘कान’ फेस्टिवलमध्ये सहभागी होणा-या मल्लिकाने ‘चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रोस्टिट्युशन’विरुद्ध आवाज उठविल्याचे दिसून येत आहे. यासाठी तिने स्वत: ला एका पिंज-यात बंद करुन घेतले आहे.

‘लहान मुलांवर होत असलेले अत्याचार बंद करा’ हे सांगण्यासाठी तिने बंद पिंज-याचे माध्यम निवडले . जर या समस्येकडे जगाचे लक्ष वेधायचे असेल तर याशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही, असे म्हणत मल्लिकाने हा फोटो शेअर केला आहे.
विशेष म्हणजे मल्लिका ‘फ्रि अ गर्ल इंडिया’ या आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्थेची सदिच्छादूत असून ही संस्था ‘मानवी तस्करी आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण’ यासारख्या समस्येविरुद्ध लढा देते. तसेच बंद पिंज-यातील फोटो शेअर करत मल्लिकाने या उपक्रमाबरोबर जोडण्याचे आवाहन केले आहे.

‘कान’मध्ये सहभागी होण्याचे माझे हे ९ वे वर्ष असून जर लहान मुलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर या शिवाय अन्य कोणताच चांगला मार्ग नाही. आणि आपला आवाज उठवायचा असेल तर कान महोत्सवाशिवाय अन्य कोणता चांगला मंचही नाही. या मंचाद्वारे संपूर्ण जगापर्यंत आपला आवाज पोहचविता येऊ शकतो. एखाद्या पिंज-यात अडकल्यानंतर मुलांची काय अवस्था होते हे आपल्याला समजणे कठीण आहे. मात्र आपण या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असेही मल्लिकाने यावेळी सांगतिले.