बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन १०-१२ वर्षे उलटली असली तरी आज सुद्धा प्रेक्षक ते तितक्याच आनंदाने पाहतात. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘कुछ कुछ होता है.’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच सलमान खानने देखील या चित्रपटात भूमिका साकारली होती. पण त्यावेळी करण जोहरने सलमान ऐवजी दुसऱ्या एका कलाकाराची निवड या भूमिकेसाठी केली होती.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. एका मुलाखतीमध्ये करण जोहरने सलमान खानने साकारलेल्या भूमिकेसाठी चंद्रचूड सिंग यांच्याशी संपर्क साधला असल्याचे म्हटले होते. पण त्यांनी भूमिकेला नकार दिला आणि सलमानची त्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

नुकताच चंद्रचूड यांनी डीएनएला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना कुछ कुछ होता है या चित्रपटातील भूमिकेच्या ऑफर विषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, ‘मी ती भूमिका नाकारल्यामुळे माझे नुकसानच झाले असच मी म्हणू शकेन. तो चित्रपट खूप चांगला होता. तुम्ही तुमच्या एखाद्या निर्णयानंतर काही गोष्टी शिकता, हा निर्णय ही माझा तसाच होता’ असे म्हटले.

करण जोहरने छोट्या पडद्यावरील टॉक शो ‘यारों की बारात’मध्ये चंद्रचूड सिंह यांनी भूमिका नाकारल्याचे सांगितले होते. ‘चंद्रचूड सिंगची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. पण त्याच्या नंतर तीन कलाकारांनी या भूमिकेला नकार दिला. मला सांगण्यात आले होते की ही भूमिका करण्यासाठी कोणताही कलाकार तयार नाही’ असे करणने म्हटले होते.