काळवीट शिकार प्रकरणात आमची सुटका झाली त्याचा मला आनंद आहे. पण सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले त्याचे दु:ख आहे. या प्रकरणात योग्य पद्धतीने न्याय झाला नाही. मला सलमानबद्दल अतिशय वाईट वाटत आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता समीर सोनीने दिली आहे. समीर सोनी अभिनेत्री नीलमचा पती आहे.

काळवीट शिकार प्रकरणात नीलमही आरोपी होती. पण जोधपूर सत्र न्यायालयाने गुरुवारी एकटया सलमानला दोषी ठरवत सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि अभिनेता सैफ अली खान यांची निर्दोष सुटका केली. वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने आज शिक्षा सुनावली.

‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. सलमान खानला न्यायालयाने शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली.

…तर आसाराम बापू शेजारी
राजस्थान पत्रिकाच्या वृत्तानुसार, कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावल्यास त्याची रवानगी सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये होऊ शकते. विशेष म्हणजे याच बराकमध्ये लैंगिक शोषणाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेला आसाराम बापूही कैद आहे. यापूर्वी जेव्हा सलमानला तुरूंगवास झाला होता तेव्हा त्याला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं.