आज तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. कालचा मोबाईल फोन आज तर आजचा उद्या कालबाह्य होईल, इतक्या झपाट्याने हे बदल होत आहेत. परंतु एकीकडे झालेल्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातुन पाहणारे लोक आहेत. तर दुसरीकडे ज्या क्षेत्रातील तो बदल आहे, त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा विरोध त्याला होत असतो. असाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या बाबतीत घडत आहे. दृष्य माध्यम क्षेत्रात ‘नेटफ्लिक्स’ या व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅपने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. लाखो प्रेक्षक आज आपले आवडते चित्रपट पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा वापर करतात. परंतु या स्ट्रीमिंग अ‍ॅपमुळे सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा निखळ आनंद प्रेक्षक हरवत आहेत. असा आरोप करत सुप्रसिद्ध दिग्दर्शक ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांनी नेटफ्लिक्सला विरोध केला आहे.

सिनेजगतातील सर्वात आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांचे नाव घेतले जाते. हॉलीवुड चित्रपट सृष्टीत त्यांच्यामुळे झालेले बदल उल्लेखनीय आहेत. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणुनही त्यांना ओळखले जाते. ई.टी.एक्स्ट्रा टेरिस्ट्रिअल, ज्युरासिक पार्क, क्लोज एनकाउंटर, वॉर ऑफ द वर्ल्ड यांसारख्या अनेक चित्रपटांतुन त्यांच्या तंत्रज्ञान प्रियतेचे दाखले आपल्याला मिळतात. त्यामुळे सिनेसृष्टीबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक मताचा अगदी गांभीर्याने विचार केला जातो. या पार्श्वभुमीवर विचार करता प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘नेटफ्लिक्स’ संदर्भात त्यांनी केलेले व्यक्तव्य समस्त चित्रपट चाहत्यांना विचलीत करणारे आहे.

‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांच्या मते चित्रपट पाहण्याची खरी मजा ही चित्रपटगृहातच येते. आपली बुद्धी व पैसे खर्च करुन प्रेक्षकांना निखळ आनंद मिळवुन देण्यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार झटत असतात. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीला जेव्हा प्रेक्षक सिनेमागृहात जाउन दाद देतात तेव्हाच कलाकारांना त्यांच्या कामाची खरी पावती मिळते. तसेच त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर कलाकारांचे मानधन ठरत असते. परंतु हल्ली सिनेमागृहात येण्यापुर्वीच इंटरनेटवर सिनेमा लीक होत असल्यामुळे निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच नेटफ्लिक्स सारख्या अ‍ॅप्समुळे फक्त सिनेमागृहांसाठीच चित्रपट तयार करणाऱ्या अनेकांचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या स्ट्रीमिंग अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोन किंवा टिव्हीवर घरबसल्या सिनेमा पाहु शकतो परंतु चित्रपटांमध्ये वापरलेले स्पेशल ईफेक्ट, संगीत, त्यातुन निर्माण झालेले वातावर यांचा खरा अनुभव आपल्याला फक्त सिनेमागृहातच घेता येतो. कारण त्यांची निर्मिती केवळ त्याच्यासाठीच झाली आहे. आणि म्हणुन ‘नेटफ्लिक्स’ सारख्या व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅपला वेळीच रोखले पाहिजे असे मत ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांनी व्यक्त केले.

नेटफ्लिक्स हे युट्युब किंवा हॉटस्टार प्रमाणे काम करणारे एक व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. यावरुन आपण आपले आवडते चित्रपट, मालिका पाहु शकतो. नेटफ्लिक्स प्रमाणेच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, हुलु, मुव्हीज एनीवेअर, ट्विच ही देखिल लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप सध्या फार चर्चेत आहेत. ही सर्व अ‍ॅप टिव्ही वाहिन्या व सिनेमागृहांना पर्याय म्हणून काम करत आहेत.