समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे सकृद्दर्शनी अयोग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. एवढेच नव्हे, तर कोणत्या प्रकरणात देशद्रोहाचे कलम लावावे आणि कोणत्या नाही याचे पोलिसांना धडे देण्याची गरज असल्याचेही म्हटले. त्याच वेळी कंगना आणि रंगोलीला अटकेच्या कारवाईपासून संरक्षण देत त्यांना ८ जानेवारीला दुपारी १२ ते २ या वेळेत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

देशद्रोहासह अन्य आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कंगनाने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच वेळी पोलिसांच्या तपासाला स्थगिती देण्याची आणि आपल्याविरोधात कठोर कारवाईपासून रोखण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर कंगना आणि रंगोलीच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी सकृद्दर्शनी कंगना आणि रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. केवळ हेच प्रकरण नाही, तर अशासारख्या अनेक प्रकरणांमध्ये पोलीस सध्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत आहेत. एखाद्याने सरकारच्या विरोधात मत व्यक्त केले वा टीका केली, तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का, आपल्याच देशातील नागरिकांवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अशी वागणूक देणार का, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. त्यामुळेच कोणत्या प्रकरणात कोणते कलम लावायचे याचे धडे पोलिसांना देण्यासाठी कार्यशाळा घेण्याचा विचार करा, अशी सूचनाही न्यायालयाने सरकारी वकील दीपक ठाकरे यांना केली. अशी प्रकरणे संवेदनशीलतेने आणि कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाहीत, अशा पद्धतीने हाताळण्याचेही म्हटले.