|| निलेश अडसूळ

निर्मात्यांनी कलाकारांचे पैसे थकवल्याच्या घटना काही आजच्या नाहीत. पूर्वीही ते घडतच होते, आजही ते सुरूच आहे. त्यात मराठी कलाकार आणि निर्मात्यांचा उल्लेख झाला ही आपल्यासाठी दुर्दैवाचीच बाब. त्याहून दुर्दैव म्हणजे याचा समाजमाध्यमांवर नको तेवढा बोभाटा झाला. निर्मात्याने इतके महिने पैसे थकवणे गैरच, पण अशा प्रश्नांवर न्याय देण्यासाठी विविध संस्था कार्यरत असताना मनातली सल फेसबुक, इन्स्टासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर बोलून दाखवल्याने आपणही इतर चार लोकांच्याच पंगतीला बसतो. मग कलाकार म्हणून आपल्या विवेकाचा, सृजनाचा काय उपयोग?, असा प्रश्न इथे उपस्थित झाला. या सगळ्या प्रकारामुळे निर्माते आणि कलाकार यांच्यात असलेलं अंतर अधोरेखित झालं आहे. भविष्यात हेच कलाकार त्याच निर्मात्यासोबत काम करतील किंवा तो निर्माता या कलाकरांना घेऊनच नवी निर्मिती करेल, पण मधल्या मध्ये दोन्ही गटाच्या मलीन झालेल्या प्रतिमा भरून निघणे कठीणच. यात चूक कुणाची आहे हे तिºहाईताने ठरवणे तसे अगदी अनुचित. एकीकडे आर्थिक दुष्काळ सोसण्याची कलाकारांची मर्यादा संपली होती आणि दुसरीकडे निर्मात्यांची आर्थिक विवंचनाही तितकीच खरी होती. खरेतर करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक समस्या इंडस्ट्रीकडून एकत्रितरित्या सोडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता आणि तरीही अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत.

‘उत्तम काम केल्यावर योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवर न मिळणे योग्य आहे का?, वेळेशी, परिस्थितीशी, घरच्यांशी, निर्मिती संस्थेकडून न मिळणाऱ्या गोष्टींशी तडजोड करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करतात. वेळच्या वेळी वाहिनीकडून पैसे येऊनही कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना निर्मात्याकडून पैसे न मिळण हे योग्य आहे का,’ असे प्रश्न कलाकारांकडून मांडण्यात आले. यावर आर्जवाची भूमिका घेत निर्मात्यानेही स्पष्टीकरण दिले. ते स्पष्टीकरण काहीसे भावनिक असल्याने निर्मात्याची बाजूही समजून घेणे लोकांनी पसंत केले. अनेक दिग्गजांचा पाठिंबाही मिळाला. ‘करोनाकळात मनोरंजनविश्वााचे आर्थिक नुकसान झाल्याने हे परिणाम दिसत आहेत,’ असे नवे वळण काहींनी या प्रकरणाला दिले. त्यामुळे खरंच निर्माते अडचणीत आहेत का, करोना याला जबाबदार आहे का, की निर्मिती क्षेत्रातली आर्थिक शिस्त भंग पावली आहे, जर दोन्ही बाजूने सामंजस्य दाखवण्यात आले असते तर काही वेगळे चित्र समोर आले असते का.. असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशाच काही मुद्द्यांवर कलाकार -निर्मात्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा हा थोडक्यात गोषवारा…

‘सिंटा आणि आयएफटीपीसी’चे अस्तित्व जाणून घ्या..

‘कलाकारांनी समाजमाध्यमांवर प्रश्न मांडण्यापेक्षा कलाकारांसाठी उभारलेल्या सिंटासारख्या संस्थेत यावे, नोंदणी करावी. असे प्रकार घडत असतात, त्यावर तोडगा काढण्यासाठीच ही संस्था आहे. कोणत्याही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी समिती बसवली जाते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. निर्मात्यांचीही आयएफटीपीसी (इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर कौन्सिल) ही स्वतंत्र संस्था आहे, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. फेसबुक गैरसमज निर्माण करण्याचे माध्यम आहे, तक्रार निवारणाचे नाही. हिंदीतील बहुतांशी कलाकार या संस्थांचे सदस्य होण्यात पुढाकार घेतात, पण मराठी कलाकार मात्र या बाबतीत मागे आहेत. जे निर्माते कलाकारांचे मानधन वारंवार थकवतात त्यांच्यावरही या संस्थांनी कारवाई केली आहे. इतकी सक्रिय प्रणाली आपल्याकडे असल्याने आपणही त्याचा भाग व्हायला हवे’, असे मार्गदर्शन निर्माते नितीन वैद्य यांनी केले.

 

करोनाची ‘कुजबुज’

‘इतर निर्मात्यांच्या बाबतीत सांगायचे तर करोनाचा नक्कीच परिणाम दिसतो. करोनाचे कारण पुढे करून काही वाहिन्यांनी मानधन कमी केले, निर्मात्यांचा करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा खर्च वाढला. टाळेबंदीत काम सुरू नसताना निर्मात्यांनी कलाकारांना मानधन दिलेले आहे. त्यामुळे निश्चिातच करोनाने निर्मिती क्षेत्रावर नकारात्मक परिणाम घडवले आहेत. –  चिन्मय मांडलेकर

निर्मात्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. शिथिलीकरणाच्या सुरुवातीला अडचणी आल्या, पण सरकार आणि वाहिन्या दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे योग्य विमे काढले गेले. दोन लाखांचा उपचार निधी तर १६ लाख निधनानंतर त्या कलाकाराच्या घरच्यांना मिळतील अशी तरतूद करण्यात आली. सुरुवातीला वाहिन्यांनी पैसे कमी केले, पण तेही अडचणीत असल्याने ते स्वाभाविकच होते.

नितीन वैद्य

हा प्रकार आजचा नाही, करोनामुळे हे झाले असेही नाही. वाहिनीचा पूर्ण पाठिंबा आजही आहे आणि टाळेबंदीतही होता. त्यामुळे करोनावर खापर फोडणे मला तरी योग्य वाटत नाही. काही ठिकाणी वाहिन्यांनी पुरेपूर पैसे देऊनही निर्मात्यांनी कलाकारांचे मानधन २० ते ३० टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे यात उगाच करोनाला मध्ये आणले जाते आहे – विद्याधर पाठारे

 

पैसे देणे ही जबाबदारी

वाहिनीचा संबंध थेट कलाकारांशी नसतो. जो काही संपर्क आणि संबंध आहे तो निर्मात्यांशीच. मालिकेचे मानधन वाहिनी निर्मात्यांना देते आणि निर्माते संपूर्ण युनिटचे मानधन देतात. असे मालिकांचे अर्थचक्र चालते. या प्रकरणात वाहिनीने वेळोवेळी मानधन निर्मात्याला दिले होते, पण ते पुढे का गेले नाही हे वाहिनीला सांगता येणार नाही. मात्र कलाकारांच्या आग्रहावरून निर्माते आणि कलाकार यांच्यात मध्यस्ती करण्याचे काम वाहिनीने केले, पण ते यशस्वी झाले नाही. निर्मात्यापर्यंत वेळेत पैसे पोहोचवणे हे वाहिनीची जबाबदारी आणि कर्तव्य होते ते आम्ही केले. किंबहुना प्रत्येकानेच हे काम जबाबदारीने करायला हवे. कलाकारांनी पैसे मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्यातून यश मिळाले नसल्याने त्यांनी समाजमाध्यमांची वाट धरली. सरतेशेवटी आपल्या हक्कासाठी कुणी काय करायचे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याने वाहिनीने त्यावर भूमिका घेणे योग्य नाही. -दीपक राजाध्यक्ष, प्रोग्रामिंग हेड (कलर्स मराठी)

 

निर्मितीसाठी ‘धन’ हवेच

निर्मिती करणे म्हणजे अगदी सोप्पे काम आहे, असा अनेकांचा गैरसमज झालेला आहे. त्यामुळे निर्मात्यांची गर्दीही वाढते आहे, पण निर्मिती क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचा भाग पैसे असल्याने ते हातात असल्याशिवाय निर्मिती करणे कठीण आणि तितकेच जोखमीचे आहे. वाहिनी पैसे कधी देईल हा नंतरचा मुद्दा आहे. कलाकार निर्मिती संस्थेत काम करत असतात त्यामुळे त्यांचे मानधन वेळेत देणे ही निर्मात्यांची जबाबदारी आहे. आर्थिक अडचणीच्या काळात तरून जाण्याची ताकद निर्मात्यांकडे असायलाच हवी. हे क्षेत्र कर्जावर रक्कम घेऊन चालणारे नाही, कारण कर्जाने कर्ज वाढत जाते आणि आहे ती रक्कमही देणे अवघड ठरते. घडलेल्या प्रकरणात कलाकारांनी भूमिका घ्यायला उशीर केला असे वाटते. जर आपल्याला मानधन दिले जात नसेल तर वेळीच यावर उपाययोजना करायला हवी होती. म्हणजे वेळीच तोडगा निघाला असता. -विद्याधर पाठारे, निर्माते (आयरिस)         

संवाद अपुरा पडतो

या एका घटनेने संपूर्ण क्षेत्राकडे बोट करणे चुकीचे आहे. ही घटना एका व्यक्तीबद्दल घडली आहे. या पलीकडे असे अनेक निर्माते आहेत जे वेळेत पैसे देतात, पण त्यांचे कौतुक आपण कधीही करत नाही. पैसे न देणे किंवा थकवणे ही निर्मात्याची चूक आहेच, पण त्यामागची पार्श्वभूमी  आपल्याला माहिती नसल्याने आपण कुणाचीही बाजू घेऊ शकत नाही. घडलेली घटना दुर्दैवी आहे, कारण कलाकारांनीही बरीच प्रतीक्षा करून हे पाऊल उचलले. पण समाजमाध्यम हा असा चव्हाटा आहे जिथे एखादी गोष्ट नमूद झाल्यावर त्याच्याशी संबंध नसलेली व्यक्तीही वाटेल ते आणि वाटेल तशा पद्धतीने व्यक्त होते. गरज नसताना सल्ले देतात. त्यामुळे अशी खासगी बाब समाजमाध्यमांवर उघड होऊ नये असे वाटते, पण कलाकारांनीही अगदी शेवटचा पर्याय म्हणून हा मार्ग स्वीकारल्याने हे वळण मिळाले. आता यातून मार्ग कसा निघेल यासाठी प्रयत्न व्हायला हवे, कारण केलेल्या कामाचे मानधन मिळायलाच हवे. जर निर्माता आणि कलाकारांमध्ये सुसंवाद असता तर हे कदाचित घडलेच नसते. त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. -चिन्मय मांडलेकर, अभिनेता- दिग्दर्शक

 

निर्मात्यांना आर्थिक शिस्त हवी

कोणत्याही क्षेत्रातील यश- उपयशामागे त्यातील आर्थिक शिस्त अत्यंत कारणीभूत ठरते. वेळेवर सगळ्यांचे पैसे देणे, कर भरणे या त्या शिस्तीतल्या प्राथमिक गोष्टी आहेत. ही शिस्त पाळणे ज्यांना जमत नाही ते निर्माते अडचणीत येतात. मराठीसह हिंदीतही मी काम करतो आहे, पण गेल्या आठ वर्षात माझ्या बाबतीत असे कधीही घडले नाही. मी कुणालाही अप्रामाणिक म्हणणार नाही, पण जेव्हा तुम्ही मालिका निर्माण करता तेव्हा केवळ प्रेक्षकांना एखादी गोष्ट सांगणे हे तुमचे काम नसते तर त्या व्यवसायातील आर्थिक तंत्रे, बारकावेही अंगी बाणावे लागतात. आपल्याला मिळालेले बजेट आणि आपण करत असलेला खर्च याचा ताळमेळ लावण्यासाठी व्यावसायिकता महत्त्वाची ठरते. – नितीन वैद्य, निर्माते (दशमी)