जवळपास २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक शंकर यांचा ‘इंडियन’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे लवकरच या सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते कमल हासन यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. ‘इंडियन २’ या चित्रपटांचं सध्या चित्रीकरण असून या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरण आंध्र प्रदेशमधील राजमुद्रा मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने काही दिवसापूर्वी कमल हासन यांनी या कारागृहाला भेट दिली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘इंडियन २’ हा कमल हसन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याचं खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटामधील काही भागांमध्ये तुरुंगातील सीन दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे फिल्ममेकर्सने शुटसाठी आंध्र प्रदेशमधील राजमुद्रा मध्यवर्ती कारागृहाची निवड केली आहे. या कारणास्तव कमल हासन आणि त्यांची टीम या कारागृहात पोहोचली असून पुढील काही दिवस या कारागृहात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येणार आहे.


चित्रपटाची टीम कारागृहात पोहोचल्यानंतर येथील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांना कमल हासन यांच्या भोवती घोळका करत त्यांची भेट घेतली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


दरम्यान, ‘इंडियन २’ हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हसन, मनिषा कोइराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते.