भारतीय चित्रपटसृष्टी अधिक प्रयोगशील होऊ लागली आहे. नवनवीन संकल्पना, त्या मांडण्याच्या नव्या नव्या पद्धती आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी शैली या सगळ्याचं मिश्रण काही चित्रपटामधून समोर येत आहे. ‘बॉम्बे रोज’ हा असाच एक वेगळा चित्रपट आहे. काय आहे त्याचं वेगळेपण? चला जाणून घेऊया.

‘बॉम्बे रोज’ हा ऍनिमेशनपट 2019 साली बनवण्यात आला. याची खासियत म्हणजे ह्या चित्रपटातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पात्र, प्रत्येक फ्रेम हे यासाठी काम करणाऱ्या कलाकारांनी स्वतःच्या हाताने कम्प्युटरवर काढली आहे. हा चित्रपट पूर्ण करायला तब्बल 18 महिने म्हणजे दीड वर्षाचा कालावधी लागला. या ऍनिमेशनच्या डिझाईनिंगसाठी 60 कलाकार काम करत होते.

या चित्रपटातल्या पात्रांना चित्रपटसृष्टीतल्या नामवंत कलाकारांनी आवाज दिले आहेत. हे कलाकार म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यप, मकरंद देशपांडे, गीतांजली कुलकर्णी, शिशिर शर्मा, विरेंद्र सक्सेना, अमरदीप झा, अमित देवंडी, सायली खरे. यांच्या आवाजांनी ही पात्रं जिवंत झाली आहेत.

या ऍनिमेशनपटाचं डिझाईन, लेखन, एडिटींग, दिग्दर्शन हे गीतांजली राव हिने केलेलं आहे. ह्या भारतीय चित्रपटाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. 2019 साली हा ऍनिमेशनपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय समीक्षक आठवड्यात दाखवण्यात आला होता.  याचवर्षी टोरंटो चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट कंटेम्पररी वर्ल्ड सिनेमा या विभागात दाखवण्यात आला.

जगभरात गाजलेल्या या चित्रपटात एक सुंदर प्रेमकहाणी दाखवली आहे. फुलं विकणारी मुलगी आणि तिच्यावर प्रेम करणारा परधर्मीय मुलगा यांची प्रेमकहाणी या चित्रपटात आहे. येत्या आठ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. याआधी तो 4 डिसेंबरला रिलीज होणार होता पण त्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर या ऍनिमेशनपटानं खूप नाव मिळवलं आहे. येत्या ८ मार्चला तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.