News Flash

युद्धपटांची वानवा!

आपल्याकडे प्रत्यक्ष युद्धघटनांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांची वानवाच दिसून येते..

|| रेश्मा राईकवार

गेल्या काही वर्षांत स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने युद्धपट दाखवायचा म्हणजे वाहिन्यांवर हमखास दिसणारा एकच चित्रपट होता तो म्हणजे जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ किंवा अगदीच जुन्या काळात डोकावयाचे ठरवले तर चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकीकत’ हा १९६४ साली प्रदर्शित झालेला भारत-चीन युद्धावरचा चित्रपट. जे. पी. दत्ता यांचेच एक-दोन चित्रपट वगळता अन्य चित्रपटांना युद्धपट म्हणण्यापेक्षा देशभक्तीपर चित्रपट असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. त्यात मग ‘टँग चार्ली’सारख्या मसाला चित्रपटांपासून ते ‘राझी’सारख्या चित्रपटांचा समावेश होऊ शकतो. अर्थात, या निवडक युद्धपटांमध्ये या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ची भर पडली आहे. मात्र एकंदरीतच बॉलीवूडपटांतच आढावा घेतला असता आपल्याकडे प्रत्यक्ष युद्धघटनांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांची वानवाच दिसून येते..

१९६४ साली चेतन आनंद यांनी भारत-चीन युद्धावर आधारित ‘हकीकत’ चित्रपट काढला होता. हा चित्रपट आजही आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट म्हणून ओळखला जातो. युद्धपटांना आपल्याकडे प्रेक्षक नाहीत असे नाही; किंबहुना युद्धपटांना प्रेक्षकसंख्या जास्त असते हेच आजवर दिसून आले आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हा त्या वेळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आजही युद्धपट म्हटले की ‘बॉर्डर’ चित्रपटाचे नाव हमखास तोंडावर येते. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचे चित्रण करणारा, त्याचबरोबरीने सैनिकांचे जीवन, त्यांचे सीमेवरचे जगणे, त्यांच्या पश्चात त्यांच्या घरच्यांची होणारी अवस्था अशा अनेक भावभावनांची गुंफण करत आलेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आपल्याकडे एखादा चित्रपट यशस्वी ठरला की, त्याच पद्धतीचे चित्रपट काढण्याची एक लाट येते. मात्र, युद्धपटांच्या बाबतीत हेही समीकरण फारसे यशस्वी झालेले दिसले नाही.

युद्धपटांपेक्षा सैनिक, त्यांचे आयुष्य, त्यांची प्रेम-विरहकथा यावरच बॉलीवूडने कायम लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जवानांच्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जाणाऱ्या कथा आपल्याक डे चित्रपटांतून पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत तर ‘डीडे’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘बजरंगी भाईजान’सारख्या चित्रपटांनी देशभक्तीपर चित्रपटांची चौकटच मोडून काढली आहे. या सगळ्याच चित्रपटांतून भारत-पाकिस्तान संबंध हाच एक मुख्य विषय राहिला आहे. मग तो दोन्हीकडे काम करणारे गुप्तहेर असोत, रॉसारखी संघटना असो किंवा दोन्हीकडच्या सामान्य माणसांची गोष्ट असो.. या सगळ्यांतून देशप्रेमाबरोबरच अनेक विषयांना लेखक-दिग्दर्शकांनी हात घातला आहे. त्यामुळे केवळ युद्धपट बनवण्यापेक्षा अशा प्रकारच्या देशप्रेमाचा, बंधुभाव असा भावनिक पदर असलेल्या चित्रपटांवर जास्त भर राहिला आहे. आपल्याकडे फारसे युद्धपट निर्माण झाले नाहीत, याचे मुख्य कारण स्पष्ट करताना आपण भारत-पाकिस्तान, भारत-चीन युद्ध वगळता मोठय़ा प्रमाणावरचे युद्ध अनुभवलेले नाही. जागतिक महायुद्धामुळे जे आर्थिक, सामाजिक, राजकीय परिणाम झाले. ज्या पद्धतीच्या शोकांकिका घडल्या. हे सगळे आपण ऐकून आहोत, मात्र तितक्या मोठय़ा प्रमाणावर आपण या अनुभवांना सामोरे गेलेलो नाही. त्यामुळे साहजिकच त्याचे प्रतिबिंब चित्रपटातून उमटणे अवघड होते, असे मत चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले.

दिग्दर्शक चेतन आनंद यांनीही १९६४ साली ‘हकीकत’ केल्यानंतर त्याचे यश पाहून तसाच प्रयत्न त्यांनी १९७३ साली ‘हिंदुस्थान की कसम’ या चित्रपटातून केला होता. मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. ‘बॉर्डर’ चित्रपटानंतर खुद्द जे. पी. दत्ता यांनीही ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटातून कारगिल युद्धाचा थरार जिवंत के ला होता. कारगिल युद्धातील विजयानंतर लगेचच त्याची कथा चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आली, मात्र त्याला ‘बॉर्डर’ चित्रपटाइतका प्रतिसाद मिळाला नाही. कारगिलच्याच युद्धाची कथा त्याच वेळी फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ चित्रपटातूनही पाहायला मिळाली होती. या वर्षी पुन्हा एकदा जे.पीं.नी ‘पलटन’ या चित्रपटातून युद्ध रंगवण्याचा प्रयत्न केला, पण तिकीटबारीवर हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र, उरीवरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकची गोष्ट रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला प्रेक्षकपसंतीही मिळाली आणि तिकीटबारीवरही चांगले यश मिळाले.

आपल्याकडे युद्धपटही एका ठरावीक साच्यातूनच बनवले जातात. युद्धपटांमध्ये युद्धाची परिस्थिती का निर्माण झाली, त्यामुळे झालेले परिणाम अशा गोष्टींपेक्षा युद्धातील सैनिक आणि त्यांच्या भावभावना यांना जास्त महत्त्व दिले जाते. अशा चित्रपटांमध्ये नाच-गाण्यांची गरज नसते, मात्र इथेही आपण आपली मसाला चित्रपट संस्कृती सोडत नाही. त्यामुळे युद्धपटांचा परिणाम, प्रभाव कमी होतो, अशी टीकाही ठाकूर यांनी केली. ‘द गाझी अटॅक’सारखा एक उत्तम प्रत्यक्ष घडलेल्या हल्ल्याची कथा सांगणारा चित्रपट आपल्याकडे आला, मात्र त्याची नीट प्रसिद्धी न झाल्याने तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या मते अशा वास्तव कथा या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्यात. त्यामुळे त्यांनी चित्रपटच नाही तर मालिकेच्या माध्यमातूनही अशा कथा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र युद्धपट नेहमीच आपल्याकडे यशस्वी ठरले आहेत, असे नाही. उलट, त्या कथांचा आधार घेऊन अनेक मसालापटांच्या शैलीतील चित्रपट बनवले गेले. अर्थात, युद्धपटांसाठी ज्या पद्धतीचे तंत्रज्ञान आवश्यक असते तेही आपल्याकडे कमी होते. ‘बॉर्डर’ असो किं वा ‘एलओसी कारगिल’ हे चित्रपट जे. पी. दत्ता यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन चित्रित केले होते. आज तशी गरज उरलेली नाही. व्हीएफएक्ससारखे तंत्रज्ञान हाताशी असताना तांत्रिकदृष्टय़ा चांगले युद्धपट करणे सहज शक्य झाले आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या यशामुळे येत्या काळात काही चांगले युद्धपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील, अशी आशा करायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 10:46 pm

Web Title: indian army war movie bollywood mpg 94
Next Stories
1 ‘लैंगिक विषयांबद्दल मोकळेपणा हवा’
2 हसवता हसवता गंभीर करणारं ‘दहा बाय दहा’
3 कुटुंबकल्ला
Just Now!
X