चित्रपट हा काळ दर्शवतो आणि प्रेक्षकांनी मागे वळून पाहिल्यास २०१८ हे वर्ष केवळ एकाच प्रकारच्या म्हणजेच केवळ सलमान खानच्या चित्रपटांसाठी ओळखलं जाऊ नये, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.

‘चित्रपट हा समाजाला ना बदलू शकत किंवा ना क्रांती करू शकत. चित्रपट हे शिक्षणाचं माध्यम आहे की नाही हेसुद्धा मी ठामपणे सांगू शकत नाही. माहितीपटातून शिकायला मिळू शकतं पण चित्रपट हे काम करू शकत नाही. लोक केवळ मनोरंजनासाठी चित्रपट बघतात आणि विसरतात. केवळ गंभीर आणि समांतर चित्रपट लोकांवर छाप सोडण्यात यशस्वी ठरतात. म्हणूनच ‘अ वेडन्स्डे’, ‘रोगन जोश’ यांसारख्या चित्रपटांत मी काम केलं. अशा चित्रपटांत भूमिका साकारणं मी माझी जबाबदारी समजतो,’ असं ते म्हणाले. भविष्यातही आपला कल सामाजिक विषयांवरील चित्रपटांकडे असल्याचं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

वाचा : ‘झी मराठी अॅवॉर्ड्स २०१८’मध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेने मारली बाजी

भारतीय चित्रपटांबद्दल निरीक्षण नोंदवताना ते पुढे म्हणाले, ‘२०१८ मध्ये भारतीय सिनेमा कसा होता, हे लोकांना कळायला हवं. भावी पिढ्यांनी मागे वळून पाहिल्यास २०१८ हे वर्ष त्यांना केवळ सलमान खानच्या चित्रपटांचं वर्ष वाटू नये.’ उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची जबाबदारी ही आपली आहे असं ते यावेळी म्हणाले.