‘पद्मावती’वरुन सिनेसृष्टी एकवटली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार असल्याचे ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ने (IFTDA) म्हटले आहे. संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार धक्कादायक असल्याचे सिनेनिर्मात्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेसुद्धा करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी विविध चित्रपट संघटनांनी पत्रकार परिषद घेतली. ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’सह इतरही चार संघटनांनी चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. बॉलिवूडमधील सिनेनिर्माते, कलाकार, लेखक यांचा या संघटनांमध्ये समावेश आहे. पत्रकार परिषदेत सिनेनिर्माते अशोक पंडित म्हणाले की, पाच चित्रपट संघटना एकत्र येऊन निर्मात्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दाद मागणार आहोत. भंन्साळींसारख्या दिग्दर्शकाला धक्काबुक्की करणे, सेटवर तोडफोड करणे हा प्रकार बघून आम्हाला धक्काच बसला, असे त्यांनी सांगितले.

‘चित्रपट अद्याप कोणी पाहिलेला नाही, तरीही काही संघटना त्याला विरोध करत आहेत. ‘इंदू सरकार’च्या प्रदर्शनावेळीही असाच गोंधळ झालेला. जर एखाद्याला चित्रपट पाहायचा नसेल तर त्याने तो बघू नका. एखादा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असे वाटत असल्यास त्याविरोधात त्याने कोर्टात जावे’, असेही त्यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना सुनावले. भन्साळी यांनी इतिहासाची मोडतोड करून चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मिनी यांच्यात प्रेमप्रसंग दाखवल्याचा आरोप राजपूत संघटनांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दरम्यान, ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झाली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. या चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मिनी यांच्यात कोणतेही आक्षेपार्ह दृष्य नसून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचे भन्साळी यांनी स्पष्ट केले होते.

अभिनेत्री दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिका राणी पद्मिनीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंहची तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.