|| भक्ती परब

‘बुगी वुगी’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’, ‘डान्स दिवाने’, ‘सुपर डान्सर्स’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’, ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ अशा नृत्याला वाहिलेल्या रिअ‍ॅलिटी शोजमधून आणि ‘दिल दोस्ती डान्स’, ‘बिंदास नाच’ यांसारख्या मालिकांतून भारतात हिप-हॉप, बी बॉईंग, पॉपिंग, लॉकिंग, स्ट्रीट डान्स असे विविध नृत्य प्रकार सादर करणारे समूह तयार झाले. यातून काहींनी वैयक्तिकरीत्या त्या त्या नृत्यप्रकारात प्रावीण्य मिळविले तर काहींनी चमू तयार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली. देशभरातील छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांमध्ये, शहरांमध्ये रुजलेल्या नृत्य संस्कृतीचा आढावा..

भरून आलेले ढग पाहून मोर आनंदाने नाचतो, असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात मोर नाचतच नाही तर मोर पाय उचलतो, मग त्याचा तोल जातो म्हणून तो दुसरा पाय उचलतो आणि पाहणाऱ्याला वाटतं मोर नाचतोय, असेही म्हटले जाते. मोराच्या नाचण्याशी आनंद आणि कारुण्य या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. भारतात दूरचित्रवाणीच्या प्रभावाने आणि त्यानंतर इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराने २००० नंतर हिप-हॉप नृत्य संस्कृती उदयास आली. याच सुमारास ‘डान्स इंडिया डान्स’ हा कार्यक्रम सुरू झाला तर त्याच्या आधी ‘बुगी वुगी’ हा कार्यक्रम सुरू झालेला होता.

नृत्यदिग्दर्शक आशीष गिरी म्हणाला, आमच्या चमूमध्ये चुनाभट्टी परिसरातली नृत्य करणारी मुलं आहेत. टीव्ही पाहूनच त्यांना नृत्याची आवड निर्माण झाली. मग आवड असलेले आम्ही सगळे २००८ मध्ये एकत्र आलो. आमच्यापैकी एक जण पानपट्टीवर, एक जण चहाच्या टपरीवर काम करतो. काही जण शाळा-महाविद्यालयात शिकत आहेत. असे आम्ही एकत्र आलो. शीव-चुनाभट्टी परिसरामध्ये कोणीच अशा प्रकारे नृत्याचा सराव तेव्हा करत नव्हतं. आम्ही ‘यूटय़ूब’वर चित्रफिती पाहून सराव करायचो. हळूहळू स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागलो. त्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला. पुढे आम्हाला बॉलीवूडमधील काही नृत्यदिग्दर्शकांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. यातून ‘आयपीएल’मध्ये सादरीकरण करता आले आणि काम करत करत पुढे जात राहिलो.

मी सर्व प्रकारच्या नृत्याचं प्रशिक्षण घेतलं असून पदवीपर्यंत शिकल्यावर मला नृत्यामध्ये शिष्यवृत्तीही मिळाली आहे. आमच्या समूहाचे नाव ‘शावलीन’ असे आहे. माझी स्वत:ची नृत्य प्रशिक्षण संस्था असून आमचे जगभर कार्यक्रम होत असतात. या सगळ्या प्रवासात सुमीत नागदेव या नृत्य प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. स्वत:ची कल्पनाशक्ती वापरून मला नृत्याच्या विविध संकल्पना साकारायच्या आहेत. तुम्हाला कुठलंही वेड असेल, त्यावर स्वार व्हा, स्वत:च्या क्षमतांवर संशय घेऊ  नका, हे आजवरच्या जगण्यातून शिकल्याचे आशीषने सांगितले.

‘बी बॉय चोझन वन’ नावाच्या मुंबईतील चमूतील साईराज म्हणाला, सातव्या इयत्तेत असताना एका मुलाला मी ब्रेकडान्स करताना पाहिलं. त्याला मी डान्स शिकवशील का विचारलं. त्याने शिकवलं. मग यूटय़ूबवर पाहूनही शिकलो. आमची आता मुंबईमध्ये एक मोठी ‘बी बॉईंग डान्सर्स’ची कम्युनिटी आहे. एक वेळ अशी होती की नृत्य करून लोकांकडे पैसे मागायचो. हिप-हॉप हा नृत्यप्रकार आमच्यासाठी जगणं आहे. मी एका कॅ फेमध्ये काम करतो. आमचा चमू आता फाइव्ह गार्डनमध्ये सराव करतो. मुंबईमध्ये बी बॉईंग नृत्य करणारे सात-आठ समूह असून आम्ही त्यांच्याशी जोडलेलो आहोत.

ऋषीकेश जाधव या रॅपरने सांगितलं, मुंबईमध्ये हिप-हॉप संस्कृती रुजायला लागली तेव्हा सर्वात आधी ब्रेकडान्सर्स आले. बरेचसे रॅपर्स ब्रेकडान्स करायचे. मग ते रॅपर्स बनले. या स्ट्रीट डान्सर्सना वातानुकूलित जागा लागत नाही. या मुलांच्या मुंबईत सरावाच्या काही जागा ठरलेल्या असतात. ‘क्लाईंब मशीन’ नावाचा एक नृत्य चमू आहे, ते जुईनगरच्या रेल्वे स्थानकात सराव करतात. एक चमू बागेत सराव करतो. आमच्या चमूतील सर्व जण आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आले असले तरी ते स्वत:ला आधी स्ट्रीट डान्सर्स समजतात.

तर मुंबईमध्ये अर्बन डान्स क्रू, गँग १३, व्ही कंपनी, डायनामिक डान्स क्रू असे जवळपास ३० ते ३५ समूह आहेत. ‘डायनामिक डान्स क्रू’ स्वप्निल पाटील याने स्थापन केला आहे. २००९ पासून २०१४ पर्यंत तीन वेगवेगळे समूह त्याने स्थापन केले पण ते पुढे टिकले नाहीत. २०१४ मध्ये ‘मूड इंडिगो’मध्ये त्यांनी नृत्य सादर केलं त्यात ते जिंकले. त्यानंतर त्यांचा यशस्वी प्रवास सुरू झाला. या समूहातील काही मुले कार्यशाळाही घेतात. आता मिळालेलं यश आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं स्वप्निलने सांगितले.

गीता कपूर, टेरेन्स लेविस, रेमो डिसूजा, पुनित पाठक, मर्जी पेस्तनजी, बॉस्को सिझर या बॉलीवूडमधील नावाजलेल्या नृत्यदिग्दर्शकांनी हिप-हॉप नृत्य प्रकार सादर करणाऱ्या मुलांना नेहमीच मार्गदर्शन करून प्रेम, प्रोत्साहन दिलं आहे. त्यातूनच धर्मेश येलांडे, राघव जुयाल, शक्ती मोहन, शांतनू माहेश्वरी अशी एक पिढी घडली आणि आता त्यांची पुढील पिढीही या मुलांच्या रूपाने घडत आहे. ‘बुगी वुगी’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘डान्स प्लस’ या तीन कार्यक्रमांनी एक वर्तुळ पूर्ण केलं असून या कार्यक्रमांमुळेच ही मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये ‘हिप-हॉप वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आणि ‘वर्ल्ड ऑफ डान्स’सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही चमकू लागली आहेत.

या मुलांनी आपली नृत्यातील आवड जोपासत त्याला व्यावसायिकतेची जोड दिली असून एका यशस्वी वळणावर पोहोचण्यासाठी लागणारी हिंमत त्यांच्यापाशी आहे. संघर्षांचं दु:ख ते कुरवाळत बसत नाहीत. तर त्यापासून धडा घेऊन उंच भरारी घेण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचा हा विश्वास आभाळाएवढा आहे. सकारात्मकतेची त्यांची ही ठेव कधीच संपणार नाही, उलट नृत्यकलेतून ही ठेव उधळून त्यांनी सगळ्यांनाच आनंदाचे क्षण दिले आहेत.

आयुष्यालाच कलाटणी

‘वर्ल्ड ऑफ डान्स’चं विजेतेपद जिंकलेल्या ‘किंग्ज युनायटेड’ या ग्रुपचे नृत्यप्रशिक्षक सुरेश मुकुंद यांचा आपणजिंकलोय यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांना अजूनही २००८ पासूनचा संघर्ष आठवतो. त्यांच्या संघर्षांवर आधारित ‘एबीसीडी २’ हा चित्रपटही आला. ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ ही स्पर्धा जिंकल्यावर काही वर्षे तरी स्पर्धामध्ये भाग घ्यायचा नाही, असं ठरवलं असल्याचं ते सांगतात. आगामी ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटामध्ये ‘किंग्ज यमुनायटेड’चं एक खास सादरीकरण असणार आहे. ‘किंग्ज युनायटेड’ ग्रुपमधील मुलांचं या विजयाने आयुष्यच बदलून गेलं. आता फक्त बॉलीवूडच नाही तर जागतिक स्तरावरील कलाकारांबरोबर काम करायचं असून तशी संधी मिळत असल्याचेही ते म्हणाले.