छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या या शोचं १२ वं पर्व रंगत असून हे पर्वसुद्धा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक त्यांच्या सुमधूर आवाजाने कानसेनांचं लक्ष वेधत आहेत. नुकतेच या मंचावर लाफ्टरक्वीन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचियाने परतले आहेत. विशेष म्हणजे या भागात सवाई भाट याचा बदललेला लूक पाहून भारती थक्क झाली असून तिने त्याची  दृष्ट (नजर) काढल्याचं पाहायला मिळालं.

इंडियन आयडॉलच्या ‘इंडिया की फर्माईश’ या विशेष वीकएण्ड भागात भारती आणि हर्ष सहभागी झाले. हा एपिसोड लवकरच प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी त्याचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. या भागात पहिल्यांदाच सवाई भाट नव्या लूकमध्ये दिसून आला. कायम पारंपरिक कपडे परिधान करणारा सवाई यावेळी वेस्टर्न कपड्यांमध्ये प्रेक्षकांसमोर आला. त्यामुळे न रहावून भारतीने त्याची थेट दृष्ट काढली.

‘इंडिया की फर्माईश’ या भागात सवाईने ‘छाप टिलक’ या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. विशेष म्हणजे हे गाण सादर करत असताना सवाईच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्याचा पेहराव आणि एकंदरीतच त्याची स्टाइल भारतीला विशेष आवडली. त्यामुळे तिने स्टेजवरच त्याची दृष्ट काढली. “या नव्या रुपात तू अगदी कूल दिसतोयेस. थांब मी तुला काळा तीट लावते”, असं म्हणत भारतीने त्याची दृष्ट काढली.

दरम्यान, सध्या इंडियन आयडॉल हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. आतापर्यंत या मंचावर अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावत स्पर्धकांना पाठिंबा दिला आहे. तसंच त्यांनी प्रोत्साहनदेखील दिल्याचं पाहायला मिळालं आहे.