क्षितिज पटवर्धन

सतत नवे काहीतरी घडवण्याचा प्रयत्न सर्जनशील व्यक्तित्वाला स्वस्थ बसू देत नाही.  नवे माध्यम हाताशी आले तर त्यातूनही वेगवेगळ्या पद्धतीने  इये  हृदयिचे.. रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात यू-टय़ूबसारखे नवे प्रभावी माध्यम हाताला लागले असल्याचे लेखक क्षितिज पटवर्धनने सांगितले. टाळेबंदीच्या काळात नेहमीचे गीतलेखन, चित्रपट लेखन सुरू आहेच, मात्र त्याबरोबरीने क्षितिजने ‘रायटर फर्स्ट’ नावाची यू-टय़ूब वाहिनी सुरू के ली आहे. या वाहिनीच्या माध्यमातून नवोदित लेखकांना या क्षेत्रात येताना नेमके  काय काय करायला हवे, या क्षेत्राचे वास्तव काय आहे हे समजून सांगण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्याने  सांगितले. याशिवाय, ‘वाघ का स्वॅग’ या अभिनेता अमेय वाघच्या वाहिनीसाठीही काही व्हिडीओ लेखन के ले असून यू-टय़ूब या नव्या माध्यमासाठी लेखन सुरू असल्याचे क्षितिज सांगतो.

‘रायटर फर्स्ट’ या वाहिनीमागचा विचार स्पष्ट करताना लेखक म्हणून आपली कारकीर्द सुरू करायची असेल तर त्यासंबंधीची कु ठलीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावे, अशी विचारणा करणारी अनेक पत्रे, ई-मेल येत होते. त्याच दरम्यान ‘रायटिंग अकॅ डमी’साठी मी काही लाईव्ह सेशन्स के ले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि तेव्हा आता आम्हाला या क्षेत्रात खरे काय चालते, नेमका स्ट्रगल कसा असतो हे जाणून घ्यायचे आहे असे अनेकांनी सांगितले. मला वाटते आपल्याकडे अनेकदा तुम्ही या क्षेत्रात या, एक चित्रपट लिहिला की तुम्हाला इतके  पैसे मिळतील, अशी चित्रे रंगवली जातात. मात्र त्यातला स्ट्रगल, वास्तव कोणी समजून देत नाही. आज दहा वर्षे मी या क्षेत्रात आहे, अकरा चित्रपट आत्तापर्यत लिहिले. माझ्या वाटय़ाला जे वाईट अनुभव आले ते इतरांच्या वाटय़ाला येऊ नयेत, या उद्देशानेच ही वाहिनी सुरू के ली आहे, असे क्षितिज सांगतो. या वाहिनीच्या माध्यमातून हिंदी-मराठीतील अनेक चांगल्या लेखकांच्या मुलाखतीही घेणार असल्याचे त्याने सांगितले. गीतकार, लेखक, ललितकथा लेखक, कादंबरी  लेखन करणारे अशा सर्वंकष पद्धतीने विचार करून या क्षेत्रातील लोकांना वाहिनीच्या माध्यमातून बोलते करण्याचा मानस क्षितिजने व्यक्त के ला.

व्ह्य़ूज वाढवायच्या काळात व्ह्य़ूज घडवणारी वाहिनी, असे त्याचे  घोषवाक्य आहे. आपली समज वाढवण्याच्या दृष्टीने यू-टय़ूब हे चांगले माध्यम आहे, पण आपण त्याचा वापर तसा करत नाही.  खरोखरच या माध्यमाचा प्रभावी पद्धतीने वापर करता येईल का? यावर काम करतो आहे, असे तो सांगतो. या नव्या माध्यमाच्या निमित्ताने नव्या लोकांशी चर्चा होते आहे, आपला परीघही वाढतो आहे, असे तो  म्हणतो. याशिवाय रोजचा व्यायाम, मानसिक  स्वास्थ्यासाठी योगा, पाककृतीचे काही प्रयोग हेही सगळे नित्यनेमाने सुरू आहे, असे क्षितिजने सांगितले.

संकलन – रेश्मा राईकवार