मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता?, असा प्रश्न विचारला किंवा एकटं असताना तुम्हाला कोणाची साथ हवीहवीशी वाटते असं विचारलं तर बऱ्याच जणांच्या उत्तरांमध्ये एकच सूर आळवल्याचं लक्षात येतं. इथे सूर आळवल्याचं म्हणण्यामागचं कारण की अनेकांची पसंती त्यांच्या आवडत्या गाण्यांना असते. गाणं मग ते कोणत्या गायकाने गायलंय इथपासून ते सूफी आहे की आणखी कुठल्या प्रकारचं आहे, इथपर्यंतचे प्रश्न हल्लीचे जाणकार श्रोते हमखास विचारतात. अशा या जाणकार श्रोत्यांच्या ‘प्लेलिस्ट’मध्ये काही गाणी अशीही आहेत, जी सध्या ट्रेंडमध्ये नसली तरीही त्यांची लोकप्रियता मात्र कायम आहे. गाण्यांची लोकप्रियता आणि थेट ‘प्लेलिस्ट’मध्ये डोकावण्याचं निमित्त म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर मल्ल्याळम गाणं ‘जिम्मकी कम्मल’ला मिळणारी पसंती. देशी गाण्यांवर थेट परदेशी लोकांनी ठेका धरण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अगदी रशियात आजही प्रेमाने ‘आवारा हूँ’ खास राज कपूर शैलीत म्हणणारी लोकं पहायला मिळतात. ‘जिम्मकी कम्मल’च्या निमित्ताने अशाच काही परदेशातही गाजलेल्या देशी गाण्यांच्या आठवणींना उजाळा..

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मल्ल्याळम चित्रपट गीतांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. याचंच ठळक उदाहरण म्हणजे ‘जिम्मकी कम्मल’. ‘एन्टामेडे जिम्मकी कम्मल..’ असे बोल असणाऱ्या या गाण्याच्या मूळ व्हीडिओपेक्षा ओनमच्या निमित्ताने कोचीच्या महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नव्या अवताराला सोशल मीडियावर सर्वाधिक दर्शक मिळाले. कोणी म्हणालं, मल्ल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता मोहनलाल यांच्या नावावर हे गाणं खपलं, तर कोणी म्हटलं, त्या मुलींच्या अफलातून सादरीकरणामुळे या गाण्याची लोकप्रियता वाढली. ‘वेल्लीपडिंते पुस्तकम’ या चित्रपटासाठी शान रहमानने संगीतबद्ध केलेलं आणि विनिथ श्रीनिवासन, रंजिथ उन्नी यांनी गायलेलं ‘जिम्मकी कम्मल’ हे गाणं तसं समजायला आणि अर्थ लावायलाही कठीणच आहे. कारण शब्दांची आणि चालीची जुळवाजुळव करूनच त्याची मांडणी करण्यात आली आहे. याआधी दाक्षिणात्य अभिनेता धनुषचं ‘कोलावेरी डी’ हे गाणं असंच प्रसिद्ध झालं होतं. मात्र ‘कोलावेरी डी’मध्ये इंग्रजी आणि दाक्षिणात्य शब्दांची सरमिसळ होती आणि गाणं तुलनेने गुणगुणायलाही सोपं होतं. ‘व्हाय धिस कोलावरी कोलावेरी डी’ असं म्हणत धनुषने जी काही जादू केली आहे त्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीच. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं आजही सुपरहिट आहे. ‘जिम्मकी कम्मल’चं तसं नाही. या गाण्याचा ठेकाही साधाच आहे आणि अगदी दाक्षिणात्य भाषेतल्या गोडव्यासह आलेलं पण सहजी गुणगुणता येणार नाही असं हे गाणं इंडोनेशियापासून अमेरिका, आफ्रिका ठिकठिकाणी गाजतंय.

एका जुन्या गाण्याला धमाल चाल लावून सादर करण्यात आलेलं हे गाणं तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये भलतंच भाव खाऊन गेलं आहे. अगदी रशिया आणि चीनमध्येही या गाण्याची लोकप्रियता पाहायला मिळाली. मल्ल्याळम चित्रपटगीतांचा हा ट्रेंड सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरही बऱ्यापैकी चर्चेत असल्याची उदाहरणं आहेत. अशा या ट्रेंडमध्ये पंजाबी गीतांना विसरून कसं चालेल? ढोल, नगाडे आणि उडता ठेका यांची सुरेख सांगड आणि तितकीच लक्षवेधी रचना असणाऱ्या पंजाबी चित्रपट गीतांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यातीलच काही गाणी म्हणजे दलेर मेहंदी यांनी गायलेलं ‘टुनक टुनक टुन तानाना’, दिलजित दोसांजचं ‘पंचतारा ठेके उत्थे’. कॅनडा (कनेड्डा) आणि इतर विविध देशांमध्ये असलेल्या पंजाबी बांधवांसोबतच परदेशी रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या या गाण्यांवर नाही म्हणता, फिरंग्यांनीही चांगलाच ठेका धरला. या यादीत आणखी एका गाण्याचा उल्लेख करायचं झालं तर, ‘मुंडिया तू बच के रही’ हे गाणं हमखास डोक्यात येतं. इंडी पॉप संस्कृतीत या गाण्याची वर्णी लागून त्याला मिळालेली लोकप्रियता वाखाणण्याजोगी आहे. ‘टुनक टुनक टुन..’ गाण्याविषयी सांगायचं झालं तर जर्मनी आणि कोरियामध्ये या गाण्याला आजही बरीच पसंती मिळते. शिवाय भांगडय़ाच्या स्टेप्सवर ठेका धरण्यात परदेशी लोकांचा हात कोणीही धरू शकत नाही.

भारतीय गाण्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पसंती मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. ‘शो मॅन’ राज कपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने परदेशी प्रेक्षकांच्या मनात भारतीय चित्रपटांविषयी प्रेम जागृत करण्याचा पायंडा घातला असे म्हणायला हरकत नाही. ‘आवारा’ या चित्रपटाला रशियामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिवाय या चित्रपटाच्या शीर्षक गीतानेही रशियन श्रोत्यांची मनं जिंकली. ‘इचकदाना बिचकदाना’ हे गाणंही रशियात बऱ्यापैकी आजही गुणगुणलं जातं. मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर’ हे गाणं हल्ली आपल्याकडेही पबमध्ये नव्याने वाजायला लागलं आहे. आपल्याकडे उशिरा का होईना नव्या पिढीच्या कानी या गाण्याचे सूर पडले असले तरी दूर चीनमध्ये अगदी रिअ‍ॅलिटी शोमध्येही हे गाणं गाऊन सादर करणारी चिनी मंडळी आहेत. फक्त भारतातच नव्हे तर, पएकमताचे ‘असेही एक साहित्य संमेलन’!रदेशातही हे गाणं चांगलंच वाजलं आणि गाजलंसुद्धा. गाण्यांच्या या यादीत तसं पाहिलं तर बऱ्याच गाण्यांचा समावेश होतो. बॉलीवूड चित्रपट संगीत हे परदेशात लगोलग व्हायरलही होतं आणि प्रसिद्धही. अगदी भाई सलमान खानच्या ‘स्व्ॉग से सबसे करेंगे स्वागत’नेही अनेकांना ताल धरायला लावला. पण, काही गाणी अगदी कुठलीही अपेक्षा नसताना व्हायरल होतात. अनेकजण आपापल्या पद्धतीने या गाण्यांचे वेगवेगळे अवतार सादर करतात. अनेकदा गाण्यातले शब्दही कळत नाहीत किंवा ठेकाच धरावा असं संगीत नसलं तरी ते लोकप्रिय होऊन जातं. अशीच काहीशी कमाल सध्या तरी ‘जिम्मकी कम्मल’ या गाण्याला साधली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या या देशी गाण्यांची ही यादी दिवसेंदिवस मोठीच होतेय.

भारतीय गाण्यांना मिळणारी लोकप्रियता पाहिल्यावर लक्षात येतंय की, इथे संगीताला दिलं जाणारं प्राधान्य हे जागतिक पातळीवरही पसंत केलं जातं. त्यामुळे ‘धिस हॅपन्स ओन्ली इन इंडिया’ असं म्हणत चक्क सातासमुद्रापार नाचणारी माणसं दिसतात तेव्हा नवल वाटल्याशिवाय राहत नाही.