27 September 2020

News Flash

ताऱ्यांची तारेवरची कसरत!

छोटय़ा पडद्यावर प्रसिद्धी मिळाली की साहजिकच कलाकाराला वेध लागतात रुपेरी पडद्याचे. रुपेरी पडदा आपण सहजपणे व्यापून टाकू असा त्यांना विश्वास असतो.

| June 5, 2014 02:51 am

छोटय़ा पडद्यावर प्रसिद्धी मिळाली की साहजिकच कलाकाराला वेध लागतात रुपेरी पडद्याचे. रुपेरी पडदा आपण सहजपणे व्यापून टाकू असा त्यांना विश्वास असतो. मात्र, त्यातील अगदी काहीजणांनाच असे करणे शक्य होते. काहींना पुन्हा छोटय़ा पडद्याकडे वळण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळेच की काय छोटय़ा पडद्यावरील ‘डेली सोप’ मालिकांचे चित्रिकरणाचे वेळापत्रक सांभाळून चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे छोटय़ा पडद्यावरील अनेक ताऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
टीव्हीकडून सिनेमाकडे वळलेल्या कलाकारांमध्ये २सर्वात प्रथम नाव घ्यायचे झाले तर ते राम कपूरचे. एकता कपूरच्या मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या राम कपूरला त्याच्या सोनीवरील ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेच्या यशानंतर अनेक बडय़ा निर्मितीसंस्थाच्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. नुकतेच त्याने साजिद खानच्या ‘हमशकल’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. मात्र, स्वतची बॉलिवूडमधील कारकीर्द सांभाळताना त्याने मालिकेलाही पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न केला. अशीच तारेवरची कसरत ‘कलर्स’वरील ‘बालिका वधू’ मालिकेचा नायक सिद्धार्थ शुक्लादेखील करतो आहे. करण जोहरच्या निर्मितीसंस्थेसाबत तीन चित्रपटांसाठीचा करार केल्यानंतर सिध्दार्थने ‘बालिकावधू’ सांभाळून ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चे चित्रिकरण पूर्ण केले.
काही वर्षांपूर्वी मालिकेतील कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या मालिकेतील पात्राचा मृत्यू दाखवायचा प्रघात होता. अर्थात, त्यावेळी किती टीव्ही कलाकार बॉलिवूडमध्ये स्थिरावले हा चर्चेचा मुद्दा आहे. पण, चित्रपटात नशीब आजमावायचे आणि नाही जमल्यास पुनर्जन्माचा फॉम्र्युला वापरुन आपल्या संबंधित लोकप्रिय मालिकेत परतायचे हा सोपा उपाय वापरलेल्या कलाकारांची उदाहरणे कमी नाहीत. आता, मात्र या टीव्ही कलाकारांना सिनेमातही तितक्याच सक्षम भूमिका साकारायला मिळत आहेत.  ‘अदालत’ मालिकेत मुख्य भूमिका करणारा रोनित रॉय असो किंवा ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मधील कपिल शर्मा असो त्यांनीही हाच मार्ग अवलंबलेला दिसून येतो. यशराजबरोबरच्या करारानंतर ‘कॉमेडी नाईट्स’ बंद करण्याच्या सर्व अफवांवर पाणी फिरवून आजही कपिल हा शो करत आहे.
आशिषला पश्चात्ताप
टीव्हीवरून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या आशिष जुनेजाने यानिमित्ताने एक मालिका पूर्ण झाल्यावर इतरही अनेक मालिकांच्या ऑफर्स केवळ काहीतरी वेगळे करायचे म्हणून धुडकावल्या. पण, नंतर सर्व प्रयत्न थकल्यावर पुन्हा मालिकांकडे वळायचे ठरवले तेव्हा मालिकांनी आपल्याकडे पाठ फिरवली होती, अशी प्रामाणिक कबूली दिली. नुकतेच एकता कपूरच्या बॅनरखाली एका चित्रपटातून झळकलेला आशिष मालिका सोडण्याचा त्यावेळचा आपला निर्णय सपशेल चुकल्याचे सांगतो. त्यामुळे टीव्ही असो किंवा सिनेमा असो कोणत्याही क्षेत्राने आपल्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा ही तारेवरची कसरत सांभाळण्याला कलाकार तयार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 2:51 am

Web Title: indian tv actor face difficulty for movies date
टॅग Bollywood
Next Stories
1 विजय गटलेवार.. संगीतकार!
2 ऑस्कर विजेते ऑलिव्हर स्टोन एडवर्ड स्नोडेनवर चित्रपट दिग्दर्शित करणार
3 सुष्मिता सेनच्या घराचे फॉल-सिलिंग कोसळले
Just Now!
X