इतिहास घडवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर कलाकृती बेतलेली असली की त्यातल्या चित्रणाबद्दल, वास्तवाच्या अस्सलतेबद्दल आणि त्या व्यक्तीस तीत योग्य तो न्याय दिला गेला आहे की नाही, यावरून नेहमीच जोरदार वाद झडत असतात. तशात तो इतिहास अर्वाचीन काळातला असेल आणि तो प्रत्यक्ष अनुभवलेली, त्यात सहभागी असलेली आणि त्या विशिष्ट कालखंडाची साक्षी असलेली मंडळी हयात असतील तर त्या कलाकृतीवर वाद होतातच होतात. त्यात राजकीय व्यक्तिमत्त्वावरील जर ती कलाकृती असेल तर मग विचारूच नका. सर्वागीण चिरफाड ठरलेलीच. त्यामुळे ऐतिहासिक कलाकृतीला हात घालण्यापूर्वी लेखकाला जय्यत तयारीनिशीच त्यात उतरावं लागतं. म्हणूनच असेल, मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारित नाटकं तशा कमीच आढळतात. शिवकालीन तसेच पेशवेकालीन व्यक्तींवरची नाटकं आपल्याकडे झालेली असली, तरी त्यांत ऐतिहासिक वास्तवापेक्षा काल्पनिकतेची भरारीच अधिक होती. याचं कारण- आपली शाहिरी परंपरा! गतेतिहासाचं उदात्तीकरण हाच तिचा पाया!! परिणामी इतिहासकालीन व्यक्तींचं काळ्या-पांढऱ्या रंगातलं रेखाटनच आपल्याकडे जास्त होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं परखड, सत्यान्वेषी विश्लेषण व चिकित्सा सहसा होत नाही. हे झालं काहीशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं! परंतु अर्वाचीन काळातील व्यक्तिमत्त्वांबद्दलही आपण सत्यशोधकी भूमिका घेत नाही. ‘गांधी-आंबेडकर’ आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ यासारख्या नाटकांतून त्या- त्या लेखकाचा त्या व्यक्तींकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. तो काही वास्तवदर्शी इतिहास नाही. ‘गांधी विरुद्ध गांधी’सारखं एखादं नाटक याला अपवाद. त्यामुळेच रत्नाकर मतकरींच्या ‘इंदिरा’ नाटकाबद्दल कुतूहल होतं. गेली दहा-बारा वर्षे ते लिहून पूर्ण असूनही रंगभूमीवर का येऊ शकलं नाही, हे जाणण्याची उत्सुकताही होतीच.

इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. ‘गुंगी गुडिया’ ते र्सवकष एकाधिकारशाही लादणारी हुकूमशहा अशी त्यांची टोकाची रूपं भारतीय जनतेनं पाहिली, अनुभवली. १९७१ साली अमेरिकेसारख्या महासत्तेला भीक न घालता त्यांनी बांगलादेशनिर्मितीचे आव्हान रणरागिणीप्रमाणे पेललं. त्यांच्या कट्टर विरोधकांकडूनही त्यांच्या या ‘दुर्गा’वताराची प्रशंसा केली गेली. मात्र, याच इंदिराजींनी पुढच्या काळात भ्रष्टाचार, घोटाळेखोर, सुमार बुद्धीचे त्यांचे चमचे यांना पाठीशी घातलं. कर्तृत्ववान सहकाऱ्यांची मात्र छाटणी केली. त्यांची ही निरंकुश, बेमुर्वतखोर सत्ता उलथून टाकण्यासाठी देशात अराजक माजवण्यापासून सैन्याला चिथावणी देण्यापर्यंत सर्वशक्तीनिशी विरोधकांनी आकाशपाताळ एक केलं. त्यांच्या या कारवायांनी चवताळलेल्या इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादून, विरोधकांच्या मुसक्या आवळून लोकशाहीचा चक्क गळाच घोटला. आणीबाणीतील अत्याचारांनी पिचलेल्या जनतेनेच अखेर इंदिराजींचा नामुष्कीचा पराभव केला. आता इंदिरा गांधी संपल्या असं सर्वाना वाटत असतानाच राखेतून आकाशात झेपावणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी पुन्हा विरोधकांना चितपट करून देशाची सत्ता काबीज केली. त्यांच्या या दुसऱ्या इनिंगमध्ये पंजाब, आसाम आणि नागालॅंडमधील फुटीरतावाद्यांच्या हिंसक कारवायांनी अक्षरश: कळस गाठला. पुन्हा देशाची फाळणी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पंजाबात अकाली दलाला नामोहरम करण्यासाठी ज्या भिंद्रनवालेला इंदिरा गांधी यांनी बळ पुरवलं, तोच पुढे भस्मासुरासारखा त्यांच्यावर उलटला. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न थकल्यावर अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करून भिंद्रनवालेचे हे भूत त्यांनी कायमसाठी गाडून टाकले. सुवर्णमंदिरातील या कारवाईने शीख समाज कमालीचा दुखावला गेला. या कारवाईचा शिखांकडून सूड घेतला जाईल असा सावधानतेचा इशारा ‘रॉ’ने दिलेला असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या शीख रक्षकांना सेवेत कायम ठेवले आणि त्यांनीच घात केला. इंदिराजींची त्यांच्या घराच्या आवारातच हत्या करून त्यांनी सूड उगवला. एका धगधगत्या पर्वाची अखेर झाली.
लेखक-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी ‘इंदिरा’ नाटकात आणीबाणीपूर्व काळ ते इंदिराजींची हत्या या साधारण दहाएक वर्षांच्या त्यांच्या जीवनाकालाचं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर त्यांनी त्यात भर दिला आहे. इंदिरा गांधी मूलत: कशा होत्या, भोवतालच्या आणि घरातल्या परिस्थितीनं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल होत गेले याचा आलेख या नाटकात आहे. तथापि एक अत्यंत धूर्त, बुद्धिमान, चाणक्यनीतीत निपुण निष्ठुर राजकारणी म्हणून त्यांनी या काळात ज्या अनेक राजकीय खेळी केल्या, जे शह-काटशहाचं राजकारण केलं, त्याची परिणती.. हा सारा व्यापक पट मात्र नाटकात अप्रत्यक्षरीत्याच येतो. त्याचं कारण मतकरींनी निवडलेली ‘स्थळ : दिवाणखाना’ ही चौकट. या चौकटीतही इंदिराजींच्या राजकारणातले पेच त्यांना दाखवता आले असते. कारण इंदिराजींसाठी राजकारण हाच त्यांचा श्वास होता. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यातल्या मनोगंडांनी जरी त्यांना या काळात सतावलं, हतबल केलं असलं तरी त्यावर स्वार होण्याची विजीगिषु वृत्ती त्यांच्यात होती. घरातले तापत्रय हाताळणं त्यांच्याकरता अवघड नव्हतं. परंतु त्यांनीच त्या हताश झालेल्या नाटकात दिसतात. मतकरी एक व्यक्ती म्हणून इंदिराजींच्या अंतरंगात उतरू पाहतात. तसा त्यांचा प्रामाणिक प्रयत्नही जाणवतो. मात्र, इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न हिस्सा असलेलं कुटील राजकारण मात्र नाटकात येत नाही. त्यामुळे पंजाबादी समस्या निर्माण होण्यातला त्यांचा सहभाग दृष्टीआड राहतो. त्यांच्यातलं सत् आणि असत् अशा दोन्ही बाबी नाटकात येत्या तर ते अधिक सखोल झालं असतं. त्याऐवजी परिस्थितीच्या कोंडीत सापडलेल्या एका कर्तबगार स्त्रीची फरफट आणि दु:खच नाटकाच्या केन्द्रस्थानी असलेलं दिसतं. ‘मी जे काही करतेय ते केवळ देशासाठीच!’ अशी जरी त्यांची भावना असली, तरी त्यामागचं त्यांचं ‘कन्व्हिक्शन’ नाटकात जाणवत नाही. अगदी वारंवार तसं त्या बोलून दाखवीत असल्या, तरीसुद्धा! संजय (गांधी) आपल्या हडेलहप्पी कारवायांनी कधीतरी आपल्याला गोत्यात आणणार हे माहीत असतानाही आणि पुपुल जयकर यांनी तशी जाणीव करून दिलेली असतानाही त्यांनी त्याला आवर घालायचा प्रयत्न कधी केला नाही. यात केवळ मुलाबद्दलचं प्रेम नव्हतं, तर त्यांच्या स्वत:त असलेली कमालीची असुरक्षिततेची भावना त्यास कारणीभूत होती असं नाटकात दाखवलं गेलं आहे. या सगळ्याची परिणती अखेर सत्ता गमावण्यात झाल्यावरही त्यांचा संजयवरचा विश्वास अढळ राहतो. संजयच्या तुरुंगातील एका भेटीचा प्रसंग यात आहे. त्यातही त्या त्याला धीरच देताना दिसतात. त्याला त्याच्या गैरकृत्यांची जाणीव करून देत नाहीत.
नाटकात इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्त्व मध्यवर्ती असलं तरी त्यांच्या भोवतालचं सर्वव्यापी राजकारण चित्रित करण्याचं मतकरींनी एकतर टाळलं आहे, किंवा एक लेखक म्हणून इंदिरेचं सहानुभूतीपूर्वक चित्रण करण्याचा निर्णय त्यांनी हेतुत:च घेतला असावा असं वाटतं. एका निरंकुश सत्ताधाऱ्याच्या आयुष्यातील वादळी राजकीय घडामोडी आणि त्यांना तोंड देता देता त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेली स्थित्यंतरं नक्कीच मनोज्ञ होऊ शकली असती. परंतु लेखक-दिग्दर्शक म्हणून मतकरींनी त्या साऱ्या घडामोडी पाश्र्वभागी ठेवल्याने त्यांची तीव्रता (इंटेन्सिटी) दृष्टीआडच राहते. त्यांचे परिणामही त्यामुळे पृष्ठपातळीवरच राहतात.
दिग्दर्शक म्हणून मतकरींनी ज्या आत्मीयतेने इंदिरा, सिद्धार्थ शंकर रे आणि संजय गांधींना न्याय दिला आहे, तसा अन्य पात्रांना दिलेला नाही. ही पात्रं अगदीच कच्ची, नाटकी वाटतात. आर. के. धवन यांचं इंदिरा गांधींच्या राजकीय व व्यक्तिगत जीवनातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं. नाटकात ते कुठल्याही ऐरागैऱ्या राजकीय पुढाऱ्याच्या चिल्लर स्वीय सचिवासारखं दाखवलेलं आहे. सोनिया, राजीव, बारुआ आदी मंडळीही सच्ची वाटत नाहीत. त्यामुळे या मंडळींच्या प्रसंगांत नाटक दाणकन् खाली येतं. इंदिराजींच्या राजकीय जीवनापेक्षा त्यांच्या मनोव्यापारावर नाटकात भर दिला गेला आहे. इतकं गजबजलेलं, कोलाहलयुक्त आयुष्य जगलेल्या कणखर स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नाटय़पूर्ण राजकीय घडामोडीच पाश्र्वभागी गेल्यानं नाटकाचा कणाच कमजोर होतो. असो.
अजित दांडेकरांच्या नेपथ्यात पंतप्रधानांचं निवासस्थान उचित नाटय़स्थळांसह दाखविताना रंगमंचाच्या मध्यभागी ठेवलेली खुर्ची मात्र अडथळा वाटते. सर्वशक्तिमान सत्तेचं प्रतीक म्हणून जरी ती अपेक्षित असेल, तरी तिचं स्थान चुकलंय. शिवदास घोडके यांनी सर्व पात्रांना दिलेल्या वेशभूषेनं नाटकाला अस्सलता आली आहे. शशांक वैद्य यांच्या प्रकाशयोजनेनं आणि परिक्षित भातखंडे यांच्या पाश्र्वसंगीतातून निरनिराळ्या प्रसंगांतलं नाटय़ अधोरेखित होतं. सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे ती रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी. त्यांनी यातल्या ऐतिहासिक व्यक्तींना त्यांचं यथार्थपण प्रदान केलं आहे. विशेषत: इंदिरा, सिद्धार्थ शंकर रे, पुपल जयकर आणि संजय गांधी यांना!
इंदिरा गांधींच्या प्रमुख भूमिकेला सुप्रिया विनोद यांनी गेश्चर व पोश्चरमधून न्याय दिला आहेच; शिवाय संवादोच्चारणापासून इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वात काळानुरूप होत गेलेले बदलही त्यांनी सर्वार्थानं दाखवले आहेत. संजय गांधींचं बेफिकीर, बेमुर्वतखोर रूप विक्रम गायकवाड यांनी तंतोतंत पकडलं आहे. अतुल महाजनांनी सिद्धार्थ शंकर रेंचा भारदस्तपणा व परिपक्वता उत्तम दाखविली आहे. चंद्रास्वामी म्हणूनही ते शोभलेत. सौम्य, सुसंस्कृत व्यक्तित्वाच्या पुपुल जयकर- लीना पंडित यांनी छान वठवल्या आहेत. नकुल घाणेकरांचा सभ्य, सुसंस्कृत, विचारी राजीव छाप पाडून जातो. परंतु त्यांना संहितेकडून अपेक्षित पाठबळ मिळत नाही. मनाली काळेंनी मनेकाचं सत्ताकांक्षी रूप नेमकं टिपलंय. अन्य पात्रांकडे त्यांच्या रेखाटनातच दुर्लक्ष झाल्यानं ती प्रभावी ठरू शकलेली नाहीत.
नाटकातल्या अशा काही त्रुटींमुळे ते अपेक्षित उंची गाठू शकलेलं नाही. मात्र, प्रयत्न चांगला आहे!

रवींद्र पाथरे