अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची मुख्य भूमिका असलेला ‘सिरीयस मॅन’ हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटफ्लिक्स ओरिजनल असलेल्या या चित्रपटामध्ये नवाजसोबतच अभिनेत्री इंदिरा तिवारी हिच्या नावाचीदेखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. इंदिराने या चित्रपटामध्ये नवाजच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तिच्या अभिनयाची अनेकांना भूरळ पडली असून ही अभिनेत्री नेमकी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

इंदिरा तिवारी मूळ भोपाळची असून तिने एनएसडीमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनयासोबतच इंदिराला नृत्य आणि गायनाची देखील आवड आहे. तिने कथ्थक, भरतनाट्यम, इंडियन बॅलेट यासारख्या नृत्य प्रकारांचं शिक्षण घेतलं आहे. सोबतच तिने शास्त्रीय गायनाचे धडेदेखील गिरवले आहेत.

सुरुवातीच्या काळामध्ये इंदिरा भोपाळमध्येच होणाऱ्या लहान-लहान नाटकांमध्ये सहभाग घ्यायची. त्यानंतर तिने एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. येथून तिच्या करिअरचा प्रवास सुरु झाला. सिरीयस मॅनपूर्वी ती आरक्षण, सत्याग्रह या चित्रपटांमध्ये कॅमियो रोलमध्ये झळकली आहे. तसंच २०१९ मध्ये नजरबंद या चित्रपटातही ती झळकली होती. विशेष म्हणजे रंगद्वेषावर आधारित अनफेअर या लघुपटामुळे ती खऱ्या अर्थाने चर्चेत आली.
इंदिरा एनएसडीमध्ये शिकत असताना तिची आणि नवाजुद्दीनची दोन वेळा भेट झाली.मात्र, त्यावेळी याच नवाजसोबत मुख्य भूमिकेत झळकायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, सिरीयस मॅन या चित्रपटाचं दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी केलं असून नवाजुद्दीन सिद्धीकीने या चित्रपटात एका तामिळ दलित व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं नाव अय्यन असं आहे.