आता अनेक कार्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही दिसतात. याच पंक्तीत हिंदीतील प्रतिष्ठीत निर्मिती संस्था असलेली ‘इंडस सिने प्रॉडक्शन’ चे नाव दाखल झालं आहे. मुंबईत एका शानदार समारंभात या कंपनीने मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आपल्या ४ महात्वाकांशी सिनेमांची घोषणा केली. मराठी सोबत हिंदीतील अनेक नामवंत कलाकार यावेळी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री मुग्धा गोडसे, प्रसिद्ध साहित्यिक फ.मुं. शिंदे, दिग्दर्शक शिव कदम, संगीतकार कनकराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टीनएज लव्हस्टोरी असलेला ‘ड्रीम डेट’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून यात, मनातली छोटीशी इच्छा व्यक्त करताना उडालेली धमाल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव ‘भिन्नाट’ असून यामध्ये दोन अवलिया व्यक्तिरेखांची सुसाट भ्रमंती आपल्याला पहायला मिळेल. या सिनेमात मकरंद अनासपुरे हटके अंदाज आणि वेगळ्या गेटअपमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती अरुणेश करणार असून दिग्दर्शनाची धूरा शिव कदम या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने उचलली आहे. त्यानंतर जय तारी दिग्दर्शित ‘कोंबडी पळाली रे’ या तिसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ‘डेंजर फेसबुक’ या हिंदी सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक मनोज नारायण करणार आहेत.