26 February 2020

News Flash

निरागस प्रेमकथा

प्रेम या विषयावर सर्वच भाषांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सातत्याने चित्रपट निर्मिती केली जाते.

| August 23, 2015 01:53 am

प्रेम या विषयावर सर्वच भाषांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सातत्याने चित्रपट निर्मिती केली जाते. गेल्या काही काळापासून पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रेम मराठी चित्रपटांमधून दाखविण्यात येत आहे. याच पठडीतील निरागस प्रेमकथा परंतु किंचित वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘स्लॅमबुक’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. मुलगा-मुलगी, मुलाचा मित्र, मुलाचे आजोबा, मुलीची आई अशा तीन-चार प्रमुख व्यक्तिरेखांच्या माध्यमातून साधारण १५ वर्षांपूर्वीच्या काळात घडलेली प्रेमकथा अतिशय साध्या-सोप्या पद्धतीने दिग्दर्शकाने यशस्वीरीत्या मांडली आहे. नवोदित प्रमुख कलावंत शंतनू रांगणेकर व रितिका श्रोत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, कुशल बद्रिके व अन्य कलावंत अशा उत्तम कलावंतांची साथ हेच या चित्रपटाचे सामथ्र्य ठरले आहे.
एकाच वसाहतीत समोरासमोर राहणाऱ्या घरांमधील अकरावीत शिकणारी मुलगा आणि मुलगी यांची ही प्रेमकथा पडद्यावर साकारली आहे. हृदय मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेला असून तो राहत असलेल्या वसाहतीत समोरच्या घरात नवीन कुटुंब वास्तव्याला येते. त्या कुटुंबातील अपर्णा या आपल्याच वयाच्या मुलीशी हृदयची प्रथम भेट, मग तिच्या मागे लागणे, दिवसभर तिच्याच विचारात मग्न राहणे, तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावणे असे त्या वयोनुरूप मुलांना मुलींविषयी वाटणारे आकर्षण, प्रेम, ती फक्त आपली आहे ही भावना उत्पन्न होणे, तिला भेटण्याआधी तिच्या मागे मागे जाणे असे सगळे हृदयला अपर्णाविषयी वाटते आणि ते ते करत जातो. एकदा हृदयचे आजोबा कृष्णकांत यांना ही गोष्ट समजते. त्याबद्दल ते हृदयला विचारतात तेव्हा तो घाबरतो, परंतु हृदयचा त्याच्यापेक्षा मोठा असलेला मित्र विष्णू आणि हृदयचे आजोबा हृदयला मदत करतात.
हृदय, त्याचे आजोबा आणि विष्णू तिघे रोज रात्री गच्चीवर जाऊन झोपत असतात. तेव्हा त्यांच्या गप्पा, आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी करून अपर्णाला मिळविण्यासाठी हृदय प्रयत्न करतो.
स्मार्टफोन, इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा वाढता जोर या आजच्या जमान्यात तरुणाईची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली नव्हती, मोबाइल नव्हते अशा साधारण १५-१६ वर्षांपूर्वीच्या काळात घडणारी गोष्ट दाखवून निरागसता, साधेपणा, प्रेम मिळविण्यासाठी आधी मैत्री करणे आणि मैत्रीसाठी स्लॅमबुकचा वापर करणे अशा पद्धतीने चित्रपटाचे कथानक उलगडण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपटाच्या शीर्षकाला अनुसरून स्लॅमबुकचा वापर कथानकात खूपच त्रोटक पद्धतीने केला आहे.
या चित्रपटाद्वारे हृदय आणि अपर्णा या भूमिका करणारे नवोदित कलावंत शंतनू रांगणेकर आणि रितिका श्रोत्री ही नवीन जोडी रुपेरी पडद्यावर आली आहे. दोघांनीही चांगला अभिनय केला आहे. दिलीप प्रभावळकर, कुशल बद्रिके यांनी या चित्रपटात धमाल केली आहे. भूमिकांची लांबी लहान असूनही प्रत्येक दृश्यामध्ये उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले आहे. अपर्णाच्या आईच्या भूमिकेतील सुप्रिया पाठारे आणि वडिलांच्या भूमिकेतील अभिजीत चव्हाण यांनीही आपापल्या भूमिका चोख साकारल्या आहेत.
हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना १५-१६ वर्षांच्या वयाच्या आठवणी जाग्या होतील. स्मरणरंजन करणारा हा चित्रपट आहे. आजच्या तरुणाईला निरागस प्रेमाची झलक या चित्रपटातून नक्कीच पाहायला मिळेल. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा दोन पातळ्यांवर चित्रपटाचे कथानक उलगडते. हृदय आणि अपर्णा मोठे झाले असून पुन्हा भेटतात. हृदय अपर्णाला भेटायला जात असताना त्याच्या मनात जागा झालेला आठवणींचा फ्लॅशबॅकमधून उलगडत जातो आणि पुन्हा वर्तमानात अवतरतो.
अनेकदा फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करताना चित्रपट प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरू शकतो, परंतु या चित्रपटात संघर्षांचे प्रसंग जवळपास नसल्यामुळे मुला-मुलींची निरागस प्रेमकथा उलगडून सांगताना केलेला फ्लॅशबॅकद्वारे प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. हृदय-अपर्णा या मोठेपणीच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलावंत हे या चित्रपटातील ‘सरप्राइज’ आहे.

स्लॅमबुक
निर्माते – सुलेखा धालगडे, ऋतुराज धालगडे
दिग्दर्शक – ऋतुराज धालगडे
कथा-पटकथा – ऋतुराज धालगडे
संवाद – हृषीकेश कोळी
छायालेखक – आनंद पांडे
संगीत – शुभांकर
संकलक – रोहित म्हात्रे
कलावंत – शंतनू रांगणेकर, रितिका श्रोत्री, दिलीप प्रभावळकर, कुशल बद्रिके, योगेश शिरसाठ, अभिजीत चव्हाण, सुप्रिया पाठारे, उषा नाडकर्णी, श्रुती मराठे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी देशपांडे व अन्य.

First Published on August 23, 2015 1:53 am

Web Title: innocent love story slam book
Next Stories
1 मालिका आणि चित्रपटांतील कलाकारांचे ग्लॅमर नाटकांना!
2 जसा आहे तसंच त्यावर प्रेम करा – रमेश सिप्पी
3 वेलकम बॅक
Just Now!
X