बायोपिकचा ट्रेण्ड असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चलो जीते है’ असे या लघुपटाचे नाव असून मंगेश हाडवळे यांनी दिग्दर्शन केले आहे. राष्ट्रपती भवनात मंगळवारी या लघुपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले. तर बुधवारी राज्य सभा सचिवालयात पार पडलेल्या स्क्रिनिंगला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रवि शंकर प्रसाद, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा आणि जे.पी. नड्डा यांनी हजेरी लावली होती.

जवळपास ३२ मिनिटांच्या या लघुपटातील मुख्य भूमिकेचे नाव नारू असे आहे. नरेंद्र मोदींचे बालपण याच चित्रीत केले असून येत्या २९ जुलै रोजी तो प्रदर्शित होणार आहे. बालकलाकार धैर्य दर्जी याने मोदींच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लघुपट पाहिल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्याची प्रशंसा केली. ”चलो जीते है’ हा लघुपट पाहिला. मंगेश हाडवळे दिग्दर्शित या चित्रपटात बालपण, निरागसता आणि बंधुभाव या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत,’ असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे.

शेतकरी आत्महत्यांवर आधारित ‘टिंग्या’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांनी केले होते. मोदींचे बालपण चित्रपटाच्या रुपात रेखाटण्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केला. ‘१९६० ते १९६५ दरम्यानचे बरेच गुजराती चित्रपट मी पाहिले. तेव्हाची संस्कृती आणि इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी मला त्याची खूप मदत झाली. त्याचप्रमाणे जवळपास तीन वर्षांतील  मन की बात मी ऐकल्या आणि मोदींच्या बऱ्याच मुलाखती पाहिल्या. लघुपट ७५ टक्के सत्यघटनांवर आधारित असून त्यातील २५ टक्के गोष्टी काल्पनिक आहेत.’ असे ते सांगतात.