बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या इरफान खानचा आज ५२ वा वाढदिवस. इरफानने आतापर्यंत त्याच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स इरफानचे कौतुक करत म्हटले होते की, इरफानचे डोळेही अभिनय करतात.

इरफानच्या वाढदिवशी त्याच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टीः

  • बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचा जन्म राजस्थानच्या जयपुरमध्ये एका पठाण मुस्लिम कुटुंबात ७ जानेवारी १९६७ ला झाला. त्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे आहे. त्याच्या वडिलांचा टायरचा उद्योग होता.

 

  • पठाण कुटुंबात जन्म जरी घेतला असेल तरी इरफान लहानपणापासूनच शाकाहारी आहे. त्याचे वडिल त्याला नेहमीच पठाणच्या घरी ब्राह्मण जन्माला आला असे बोलून चिडवायचे. त्याने १९८४ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून म्हणजे एनएसडीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तेव्हा त्याला शिष्यवृत्तीही मिळाली होती.

 

  • इरफानच्या करिअरचा सुरुवातीचा काळ फारच कठिण होता. जेव्हा त्याला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला, त्याच काही दिवसांत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरात कमवणारे असे कोणीच नव्हते. त्याला घरुन पैसे मिळणेही बंद झाले होते. त्याला एनएसडीकडून मिळणाऱ्या पैशांचीच फक्त मदत होत होती.

 

  • एनएसडीमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर इरफान दिल्लीवरुन मुंबईत आला. मुंबईत येऊन त्याने ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘सारा जहां हमारा’, ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांता’ आणि ‘श्रीकांत’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. २३ जानेवारी १९९५ मध्ये त्याने लेखिका सुतपा सिकंदरशी लग्न केले. सुतपाही एनएसडीमध्ये त्याच्यासोबत शिकत होती. त्यांना दोन मुले असून बाबील आणि अयान अशी त्यांची नावे आहेत.

 

  • इरफानची हिंदी, इंग्रजी सिनेमांचा तसेच मालिकांचा अभिनेता अशी ओळख आहे. हरहुन्नरी इरफानने आपल्या २८ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याने ‘ज्युरासिक वर्ल्ड’ आणि ‘स्पायडर मॅन’ यांसारख्या हॉलिवूडपटात काम केले आहे.

 

  • इरफानने पहिल्यांदा २००५ मध्ये आलेल्या रोग या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘हासिल’ या सिनेमासाठी इरफानला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर इरफानने ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पिकू’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. इरफान खानला पान सिंग तोमर या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तसेच २०११ मध्ये भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

 

  • त्याने मदारी, ‘जज्बा’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘द नेमसेक’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘पान सिंग तोमर’, ‘हासिल’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तलवार’, ‘मकबूल’, ‘ये साली जिंदगी’, ‘द अमोजिंग स्पाय’, ‘यू होता तो क्या होता’, ‘७ खून माफ’, ‘डी-डे’, ‘बिल्लू’, ‘अपना आसमान’, ‘सलाम बॉम्बे’, ‘रोग’, ‘डेडलाइन सिर्फ २४ घंटे’, ‘नॉक आउट’, ‘ए माइटी हार्ट’, ‘किस्सा’, ‘थँक यू’, ‘क्रेजी ४’, ‘चमकू’, ‘राइट या राँग’, ‘चेहरा’, ‘मुंबई मेरी जान’, ‘द वॉरियर’, ‘द किलर’, ‘कसूर’, ‘क्राइम’ यांसारख्या सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.