05 July 2020

News Flash

‘अशी ही बनवाबनवी’ची ३१ वर्ष पूर्ण; जाणून घ्या या सिनेमाबद्दलच्या काही भन्नाट गोष्टी

मराठी चित्रपटाचे सोनेरी पान असा या चित्रपटाचा उल्लेख केला जातो

‘अशी ही बनवाबनवी’ची ३१ वर्ष पूर्ण

शेखर हंप्रस

२३ सप्टेंबर १९८८ ला मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याला आज  ३१ वर्ष पूर्ण झाली. एवढी र्वष उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक कीर्तीचा क्रिकेटमधील देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असो अशी ही बनवाबनवी हा चित्रपट या सर्वाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी नेटक ऱ्यांची पसंतीही या चित्रपटाला मिळाली आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो.

मराठी चित्रपटाचे सोनेरी पान असा या चित्रपटाचा उल्लेख झाला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. हा चित्रपट आजही आवडीने आजची पिढी पाहते. जेव्हा पुण्याच्या प्रभातला ३ रुपये फर्स्ट क्लास आणि ५ रुपये बाल्कनीला तिकीट होते तेव्हा ३ कोटीचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हेच गणित आज लावले तर शंभर कोटीच्या घरात पोहोचेल. विशेष म्हणजे समाजमाध्यमांच्या जमान्यातही या चित्रपटाचे गारुड मनावर आरूढ  झालेले पदोपदी दिसून येते. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट जवळपास सर्वानी पाहिलेला आहे तर अनेकांनी त्याची पारायणं केली आहेत. त्यामुळे चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप आजच्या घडामोडींचा उल्लेख जेव्हा समाजमाध्यमांवर केला जातो तेव्हा तो लोकांना लगेच लक्षात येतो आणि त्याचा परिमाणही अधिक होतो. चित्रपटातील प्रसंगांचा असा होणारा वापर हा कदाचित जगातील सर्वाधिक वापर होणारा मराठी चित्रपट असेल. याच चित्रपटात एक दृश्य आहे. यातील नायक धनंजय माने हा बनवाबनवी करून घर मालकाकडून पन्नास रुपये उसने घेतो. हेच पैसे जेव्हा घरमालक परत मागतो तेव्हा तुम्ही दिलेले पन्नास रुपये वारले, हा त्याचा संवाद प्रचंड गाजला. हाच संदर्भ नेटकऱ्यांनी जेव्हा केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांची नोट अचानक बंद केली तेव्हा वापरला. त्यावेळी पोस्ट झालेल्या अनेक चित्रात धनंजय माने आपल्या मालकाला सांगतो तुम्ही दिलेले ५०० रुपये वारले. याच चित्रपटातील असे अनेक प्रसंग समाजमाध्यमांवर वापरले गेले. ही या चित्रपटाच्या लोकप्रियतेचीच पावती आहे, असे म्हणता येईल.

‘लोकप्रियतेबद्दल विश्वास होता’

‘आपण कुठल्याही गोष्टीला आकार देत असतो त्यावेळी आपल्याला ती गोष्ट कशी होईल याची एक कल्पना त्याच्या शेवटाला येत असते. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट बनवतांनाच्या अनेक आठवणी आहेत. त्यात मी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण सुरू असताना निर्माते किरण शांताराम यांना म्हणालो होतो की मला ते रजत महोत्सव पूर्ण झाल्यानंतर सन्मानचिन्ह देतात ते बनवणाऱ्या कलाकारांना भेटायचं आहे. त्यावेळी मी त्यांना भेटून सन्मानचिन्ह बनवून घेतलं. त्यावेळी मला त्या कलाकारांनी वेडय़ात काढलं असेलही पण तो माझा आत्मविश्वास होता. जसा जसा चित्रपट पूर्ण होत होता तसतसं मला चित्रपट लोकप्रियतेचा शिखर गाठेल हा विश्वास मनात पक्का होत होता. आज तीस वर्षांनंतरही हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतो आहे.’

– सचिन पिळगावकर, अभिनेता-दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 10:22 am

Web Title: interesting facts about marathi movei ashi hi banwa banwi as it completes 31 years scsg 91
Next Stories
1 ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’, म्हणत प्रियांकाने करीनाला दिलं होतं सडेतोड उत्तर
2 शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये सान्या मल्होत्रा साकारणार ‘ही’ भूमिका
3 शेतकऱ्यांच्या आयुष्यावरील ‘मोती बाग’ची ऑस्करच्या दारावर थाप
Just Now!
X