‘मुघल ए आझम’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अक्षरशः खळबळ माजवणारा, अनेक विक्रम करणारा, अनेक दंतकथा आणि घटनांनी भरलेला, खूप गुणी कलावंतांना एकत्र आणणारा, प्रचंड खर्चाचा असा खरंच ‘या सम हा’ असा चित्रपट होता.

या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता.

या चित्रपटाचा शुभारंभ (प्रिमियर) ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.

या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅटमधील दोन जोकरवर ‘मुघल ए आझम’ असे छापले आहे.

त्यावेळी ११ वर्षे वय असलेल्या मला, माझे वडील हा थाट पाहायला मराठा मंदिरला घेऊन गेले होते. ‘उच्चभ्रू प्रतिष्ठित’ तर आम्ही तेव्हाही नव्हतो. पण हा दोन कॅट्सचा सेट माझ्या वडिलांच्या एका मित्राने त्यांना दिला होता आणि तो मी आज ५७ वर्षे जपून ठेवला आहे. आज ही एवढी दुर्मिळ ठेव पाहताना, उगाचच मला आपण ‘हिंदोस्तांकी सरजमींके बादशाह ए आलम’ वगैरे असल्यासारखे वाटायला लागते.

सौजन्य: मकरंद करंदीकर