चित्रपटाचे जग म्हणजे लहान-मोठे वाद सतत सुरूच असतात. फिल्मी गॉसिप्सच्या पलिकडे जाऊन काही तात्विक, वैचारिक वादाचे प्रमाण अलिकडे खूप वाढलयं. काही वेळा त्यात याच चित्रपटसृष्टीतील वैयक्तिक हेवेदाव्यांचे दर्शन-प्रदर्शनही होते. काही वाद चित्रपट प्रदर्शित होताच संपुष्टात देखील येतात. पण अशाच अनेक प्रकारच्या वादाच्या भोवऱ्यात अथवा सावटाखाली भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होणार असेल तर त्यात सहभागी देश-विदेशातील चित्रपटापेक्षाही या वादाचे काय बरे होणार याकडे खुद्द चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यमे व चित्रपट रसिकांचे लक्ष लागणारच.

यावर्षीच्या भारताच्या अठ्ठेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ( २० ते २८ नोव्हेंबर ) गोव्यातील पणजी येथे सुरुवात होण्याच्या आदल्याच दिवशी संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावती’ चे पूर्वनियोजित १ डिसेंबरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले व चित्रपटसृष्टीकडून काही प्रमाणात प्रतिक्रिया उमटली . चित्रपट महोत्सवातही यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटेलच. काहीजण एकूणच वाढत्या बाह्यसेन्सॉरशीपवर कडाडून टीकाही करतील. पण ते होताना आपण विदेशी चित्रपट विश्लेषक, अभ्यासक यांच्यासमोर काहीसे चुकीचे चित्र तर मांडत नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागेल. अन्यथा अधिकृत सेन्सॉरपेक्षा समाजातील इतर घटकांचा प्रभाव आपल्या चित्रपटांना मान्य करावा लागतोय असाच समज व्हायचा. खरं तर बाह्यसेन्सॉरशीपवर शासनाने अंकुश आणावा यावर सडेतोड चर्चा करतानाच इतरांचे मुद्दे विचारात घेण्यास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे व्यासपीठ योग्य संधी आहे. शबाना आझमीने तर ‘पद्मावती’ प्रकरणावरून हिंदी चित्रपटसृष्टीने या चित्रपट महोत्सवावरच बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. अधिकृत सेन्सॉरच्या नियमात बदलत्या काळानुसार बदल व्हावेत आणि चित्रपट माध्यमाची भाषा माहित असणार्‍यांची सेन्सॉरवर निवड व्हावी अशी मागणी याच चित्रपट महोत्सवातील परिसंवाद व पत्रकार परिषदेत होऊ शकते. हा महोत्सव जसजसा रंगात येईल तशा अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

भारतीय पॅनोरमात एकाच वेळेस आठ मराठी चित्रपट निवडले जाण्याचा योग पहिल्यांदाच आला. फार पूर्वी एकादा गगनबिहारी बोराटे दिग्दर्शित ‘सूर्योदय’ (१९८९) हा नाना पाटेकर व दीप्ती नवलची भूमिका असणारा मराठी चित्रपट अथवा जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता’ (१९९४ ) हा सोनाली कुलकर्णीचा पहिला मराठी चित्रपट या महोत्सवात दाखल होताच मराठी चित्रपट रसिकांना केवढा तरी आनंद होई. कालांतराने या परिस्थितीत फरक पडला. तरी काही वाद निर्माण होतच आहेत. रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ चित्रपट पॅनोरमाच्या परिक्षकानी फक्त नाव ऐकून नाकारला यावरून खूपच मोठा वाद झाला. या पॅनोरमासाठी चित्रपट सेन्सॉर संमत होणे आवश्यक आहे का यापासून ‘न्यूड’ पूर्णच नव्हता येथपर्यंत बरेच मुद्दे गाजले. ‘न्यूड’ ला पाठिंबा देण्यासाठी iffi त निवडलेल्या सर्वच मराठी चित्रपटानी माघार घेऊन आपली ऐकी दाखवावी असाही एक महत्त्वपूर्ण मुद्दा गाजला.

पण काही मराठी दिग्दर्शकानी अशा मोठ्या चित्रपट महोत्सवात आपल्याला पहिल्यांदाच संधी मिळतेय अशी काहीशी भावनिक वाटणारी भूमिका घेतली. ती अगदीच चुकीची म्हणता येणार नाही. पण असे करणे बालिश आहे. असाही एक सूर उमटलाच. सोशल मिडियाच्या काळात सर्वचजण आपले मत व्यक्त करू लागल्याने गोंधळात भरच पडली. त्यातच संदीप पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ वादात सापडूनच प्रदर्शित झाला. या सगळ्याच गोष्टींचे प्रतिबिंब या चित्रपट महोत्सवात पडणे अगदी स्वाभाविक आहे. खरं तर या महोत्सवावरच मराठी चित्रपटसृष्टीने बहिष्कार घालणे म्हणजे या महोत्सवासाठी हजर असलेल्या देश विदेशाच्या प्रतिनिधी, अभ्यासक, विश्लेषक यांच्या समोर आपला चित्रपट नेण्याची संधीच गमावणे होय. त्यांच्याकडून मिळणारी प्रतिक्रिया अथवा शाबासकी हुरूप वाढवणारी ठरू शकते. महोत्सवातील ‘फिल्म मार्केट’ मुळे एखाद्या मराठी चित्रपटाला विदेशातील हक्क विकता येऊ शकतात. खूपच मोठा विस्तृत व सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच या चित्रपट महोत्सवाला सामोरे जायला हवे. याबाबत भावूक होऊन कसे चालेल? ‘न्यूड’ ला नाकारल्यावरची वेगळीच प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीला अजूनही करता येईल. ती म्हणजे पणजीतच याच महोत्सव काळात एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये समांतर चित्रपट महोत्सव आयोजित करून त्याचे उदघाटनच ‘न्यूड’ने करणे. म्हणजेच आपला चित्रपट पूर्ण स्वरूपात तयार आहे हेदेखील त्यातून ‘दाखवता’ येईल . ते जास्तच कौतुकास्पद व लक्षवेधक ठरेल. पण आता नेमका कोणत्या स्वरूपात ‘न्यूड’वर मराठी चित्रपटसृष्टी प्रत्यक्ष महोत्सवात निषेध व्यक्त करतेय व त्याला हिंदी चित्रपटसृष्टीसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीचा सहभाग वा पाठिंबा मिळतोय हेच पाह्यचे . अलिकडच्या काळात ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ , ‘ऐलिझाबेथ ऐकादशी’, ‘रिंगण’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ अशा अनेक चित्रपटामुळे अन्यभाषिक प्रेक्षक व चित्रपटसृष्टीचे मराठी चित्रपटाकडे विशेष लक्ष गेले. ‘सैराट’ ची कन्नड रिमेक प्रदर्शित झाल्यावर तो आता हिंदीत बनतोय. अशा अनेक गोष्टीना या चित्रपट महोत्सवात चालना मिळते. असा महोत्सव म्हणजे एक प्रकारची चित्रपटांची जत्राच तर असते. यावर्षी त्यावर ‘न्यूड’ ( मराठी), ‘एस दुर्गा’ ( मल्याळम) या चित्रपटाना डावलल्याच्या वादाचे मोठेच सावट आहे. अशा एकूणच वादांचा या चित्रपट महोत्सवावर कसा परिणाम होतोय की याच वादातून आणखीन काही नवीन वाद जन्माला येतात हेच पाह्यचे. ‘पद्मावती’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात हा महोत्सव सुरु होत असल्याने या चित्रपटाचा व वाढत्या बाह्यसेन्सॉरशीपवर उदघाटन सोहळ्यातच भाष्य अपेक्षित आहे. मग ते महोत्सव आयोजकांकडून असो वा चित्रपटसृष्टीकडून असो. तसे वक्तव्य म्हणजेदेखिल अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. ते साध्य करण्याची एक महत्त्वपूर्ण संधीच भारतच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मिळतेय. याच माध्यमातून जगभरातील चित्रपट रसिकांपर्यंत आपल्या भावना पोहोचवता येतील. एखादा चित्रपट महोत्सव असा वेगळा देखील असू शकतो. नेहमीच्याच ग्लॅमर-नृत्य-विनोद या स्वरूपापेक्षा हा अगदीच वेगळा प्लॅटफॉर्म आहे. त्यावरुन अनेक गोष्टींवर भाष्य करण्याची मोठी संधी तर आहे.
दिलीप ठाकूर