‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड’ अर्थात ‘इम्फा’ सोहळय़ासाठी एका क्रूझवरून युरोपची समुद्र सफर करणाऱ्या मराठी सिने-नाटय़सृष्टीतील कलाकारांनी इटली, स्पेन आणि फ्रान्समधील प्रेक्षणीय स्थळांची भ्रमंती केली. सुमारे आठवडाभराच्या जहाज सफरीदरम्यान या तीन देशांतील विविध ठिकाणांना भेट देणाऱ्या या सेलिब्रिटींसाठी रोम शहरातील भटकंतीचा अनुभव संस्मरणीय ठरला.

पहिल्या वर्षांत हाँगकाँग ते व्हिएतनाम अशा सागरी प्रवासात पार पडलेला ‘इम्फा’ सोहळा यंदा युरोपमधील भूमध्य समुद्रातून प्रवास करणाऱ्या नॉर्वेजियन एपिक या क्रूझवर पार पडला. या निमित्ताने मराठी चित्रसृष्टीतील नामवंत आणि नवोदित कलाकारांचे ‘गेटटुगेदर’च घडले. विविध सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या सोळा मजली क्रूझवरील मुक्कामाचा अविस्मरणीय आनंद कमी म्हणून की काय, या साऱ्यांना रोम, बार्सिलोना, कान, फ्लोरेन्स, पिसा अशा जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांची भटकंती करण्याची संधीही या निमित्ताने मिळाली. ‘इम्फा’ पुरस्कार सोहळा लवकरच कलर्स मराठी या वाहिनीवरून दाखवला जाणार आहे. या वेळी कलाकारांच्या या भटकंतीचे अनुभव आणि क्रूझवरील गंमत जंमत या गोष्टीदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
बार्सिलोनावरून निघालेली ‘एपिक’ क्रूझ प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी नेपल्स अर्थात नापोली या बंदरात पोहोचली. येथे कॅप्री बेटे, अमाल्फी कोस्ट, पॉम्पेई अशा ठिकाणी कलावंतांनी भेटी दिल्या. त्यानंतरच्या पुढच्याच दिवशी क्रूझने इटलीतील रोम शहरापासून जवळ असलेले सिव्हिट्रीवेस्सिया हे बंदर गाठले. रोमन साम्राज्याच्या पाऊलखुणा दाखवणारी स्थळं, महान चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृती, जागतिक आश्चर्य असलेले कोलासियम हे इसवी सन ७०मध्ये बांधलेले भव्य प्रेक्षागृह, व्हॅटिकन सिटी, व्हॅटिकन वस्तुसंग्रहालय अशा अद्भुत ठिकाणांची सफर करण्याची पर्वणी कलाकारांना या दिवशी मिळाली. तर त्याच्या पुढच्याच दिवशी युरोपमधील कला आणि संस्कृतीचे माहेरघर समजले जाणारे फ्लोरेन्स आणि झुकत्या मनोऱ्यामुळे जागतिक आश्चर्यात स्थान मिळालेले पिसा ही शहरे पाहायला मिळाली. यानंतर क्रूझने फ्रान्समधील कान हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन स्थळ असलेले ठिकाण गाठले. यातील प्रत्येक ठिकाणी मराठी कलाकारांनी भटकंती केली. त्यातही रोम शहरातील स्थापत्य आणि कलासौंदर्य पाहून प्रत्येक जण भारावला होता. प्रत्येक ठिकाणी क्रूझ केवळ दिवसभर थांबत असल्याने तेथील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पाहणं सेलिब्रिटींना शक्य झालं नाही. मात्र, प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे ठिकाण निवडून गटागटाने भटकंती करून आला. सहल करून क्रूझवर परतलेल्या कलाकारांची मग जहाजाच्या खुल्या डेकवर गप्पांची मैफील जमायची आणि प्रत्येकजण आपला अनुभव आणि काढलेले फोटो शेअर करायचा. मैफिलीचा शेवटही दुसऱ्या दिवशी कुठे आणि कसे जायचे या चर्चेनेच होत असे. ‘आम्ही एरव्ही खूपच कमी भेटतो. मात्र, युरोपातील ठिकाणे पाहण्यासाठी एकत्रपणे हिंडतानाचा अनुभव अतिशय विलक्षण होता,’ असे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सांगितले. तर ‘ही सर्व ठिकाणे फिरताना आम्ही सर्व एकाच कुटुंबातले असल्याची खात्री पटत होती,’ असे अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी म्हटले.
आमची भटकंती

जरासा ‘हटके’ अनुभव
युरोपच्या या भागातील आमचा पहिलाच दौरा होता. त्यामुळे क्रूझवर आल्यानंतर प्रवासात लागणाऱ्या विविध ठिकाणांचा आम्ही अभ्यास केला. त्यातील काही विशिष्ट गोष्टी आम्हाला करायच्या होत्या. क्रूझच्या सहलींच्या पॅकेजमध्ये तसं करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही स्वतंत्र फिरण्याचं ठरवलं. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाव्हारस आणि राखेमुळे २० फूट जमिनीत गाडलं गेलेलं आणि बऱ्याच वर्षांनी उत्खनन करण्यात आलेलं पॉम्पेई हे शहर आम्ही पाहिलं. तर फ्लोरेन्समधील लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतावर धडकलो. तेथे आम्ही ताज्या ताज्या वाइनची चव चाखली आणि त्या शेतकऱ्याकडेच जेवलो. महाराष्ट्रातील एखाद्या खेडय़ात जाऊन झुणका-भाकर खाण्याचा जो आनंद असतो, तसा आनंद आम्हाला त्या शेतकऱ्याच्या घरी मिळाला.
– उर्मिला कोठारे, अभिनेत्री

डोळय़ांत अश्रू उभे राहिले
‘‘इम्फा’च्या निमित्ताने अख्खी मराठी इंडस्ट्री एकत्र आली. इटली, फ्रान्स, स्पेन या देशांतील सुंदर ठिकाणी सगळय़ांनी एकत्र फिरताना आयुष्यातला खूप मोठा अनुभव मिळाला. मी स्वत: जेजेचा विद्यार्थी असल्याने रोमची शिल्पे आणि चित्रे आम्हाला अभ्यासात होती. मात्र, या कलाकृती प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव विलक्षण होता. इतक्या वर्षांपूर्वी साकारलेल्या या कलाकृती आजही जिवंत वाटतात. ते पाहताना अक्षरश: डोळय़ांतून पाणी आलं.’
– रवी जाधव, दिग्दर्शक

चकाकत्या पाण्याची जादू
या सफरीतील सगळीच ठिकाणं अप्रतिम आणि संस्मरणीय होती. मात्र, काप्री या बेटावर गेल्यानंतर निसर्गाला देव का म्हणावं, याचं उत्तर सापडतं. या बेटाजवळ एक समुद्री गुहा आहे. या गुहेत एका छोटय़ाशा होडीतून शिरावं लागतं. आत मिट्ट काळोख असतो आणि आपण आत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी डोळे फाडून बघत असतानाच होडी माघारी वळते आणि समोरील दृश्य डोळे दिपवणारं असतं. गुहेच्या त्या चिंचोळय़ा दारातून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने उजळून निघालेलं पाणी पाहून आपण जादूच्या दुनियेत असल्याचा भास होतो. त्या प्रकाशात गुहेतील निळं-हिरवं पाणी असं चकाकतं की जणू कुणीतरी समुद्राच्या पोटातून दिवे लावले आहेत.
– पूजा सावंत, अभिनेत्री