फ्रान्समधील द इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीने (ISU) अभिनेता सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांतने १४ जून रोजी मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांंबरोबरच बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. सुशांतला विज्ञानाची विशेष आवड होती. माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, भौतिक शास्त्र याबद्दल सुशांतला विशेष प्रेम होतं. सुशांतने अनेक शैक्षणिक संस्थानमध्ये विद्यार्थ्यांशी संवादही साधले. तो फ्रान्समधील इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीमध्येही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार होता असं विद्यापिठाने त्याला वाहिलेल्या श्रद्धांजलीमध्ये म्हटलं आहे. विद्यापिठाच्या वेबसाईटवर सुशांतला श्रद्धांजली वाहणारे अधिकृत पत्रक पोस्ट करण्यात आलं आहे.

ट्विटरवरुनही सुशांतचा फोट पोस्ट करत, “लोकप्रिय भारतीय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. सुशांत हा विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणिताच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारा होता. तो आमच्या विद्यापिठाच्या कामासंदर्भात माहिती घेत असायचा,” असं नमूद करण्यात आलं आहे.

तर वेबसाईटवरील श्रद्धांजलीमध्ये सुशांत २०१९ साली विद्यापिठाला भेट देणार होता मात्र वेळेचे नियोजन न झाल्याचे त्याला भेट देता आली नाही असंही विद्यापिठाने म्हटलं आहे. सुशांतला खगोलशास्त्रामध्ये विशेष आवड होती. चंदा मामा दू रे या चित्रपटामधील भूमिकेसंदर्भात संशोधन करण्यासाठी तो २०१७ साली नासामध्येही जाऊन आला होता. सुशांतला त्याच्या घराच्या गॅलरीमधून चंद्र पाहायला आवडायचं. त्याने चंद्रावर एक प्लॉटही विकत घेतला होता. चंद्र आणि ग्रह ताऱ्यांचे निरिक्षण करण्यासाठी त्याच्याक १४ इंचांची एलएक्स ६०० ही अत्याधुनिक दुर्बिणही होती.

इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा होता. तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम या इंजिनियरिंगच्या प्रवेश परिक्षेमध्ये तो देशात सातवा आला होता. त्यानंतर सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले होते.

नृत्यातून कला क्षेत्रात प्रवेश

इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना त्याने शामक दावरकडे नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. २००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.