News Flash

International Tea Day 2017 BLOG : ‘गरम चाय की प्याली हो…’

चित्रपटसृष्टी व चहा यांचे पडद्यावर व पडद्यामागे घट्ट नाते.

आज ‘जागतिक चहा दिन’ चित्रपटसृष्टी व चहा यांचे पडद्यावर व पडद्यामागे विविध स्तरावर अगदी घट्ट नाते!  चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वात चवदार-यादगार व पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा चहा राजेश खन्नाच्या खार येथील कार्यालयात मिळे. ज्यांनी त्याचा आस्वाद व आनंद घेतलाय ते अनेक दिवस त्या चहावरच बोलत. एक तर राजेश खन्ना कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर वेळेवर येत नसे, त्याच सवयीनुसार तो आपल्या ऑफीसमध्ये तरी कसा बरे वेळेवर येईल? त्याच्या मुलाखतीसाठी साडेअकराची वेळ ठरलेली असली तरी तो एकपूर्वी क्वचितच येई. तोपर्यंत दोनदा चहा होई…. छे, छे दोनदा चहा मिळायलाच हवा असे वाटे. भरभरून आले आणि कुटलेले ड्रायफ्रूटस त्यात वेगळीच चव आणे. अर्थात राजेश खन्ना गप्पांना सुरुवात करताना, आपने चाय पी की नही असे विचारतच आणखीन एक कप मागवे. तेव्हा कोण नको म्हणणार? आपण त्याचे ‘चहा’ते कधी झालो हे समजत देखील नसे.

चित्रीकरणापासून इव्हेंटपर्यंत चित्रपटसृष्टीत सर्वत्र संचार असणारी गोष्ट म्हणजे ‘चहा’ ! सगळीकडचा मिळून दिवसभरात किती चहा या क्षेत्रात प्यायला जातो याची मोजदाद कशाला हो करायची? पण ‘टायगर जिंदा है ‘ अथवा ‘पद्मावती’च्या निर्मितीच्या पहिल्या बैठकीपासून मग प्रत्येक चित्रीकरण सत्र, विविध कारणास्तव बैठका वगैरे वगैरे स्तरावर एकूणच प्यायल्या जाणार्‍या चहाच्या बजेटमध्ये एक छोटासा सामाजिक मराठी चित्रपट निर्माण होऊ शकेलही. मोठ्या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया दीर्घ असते हे लक्षात घेऊन गणित केलेय. त्यात पुन्हा स्पॉटबॉयचा चहा साधा व सुपर स्टारचा खास हा फरक आहेच. कधीतरी एखाद्या निर्मात्याने कधी तरी म्हणावे, आमच्या चित्रपटाच्या सेटवर स्टुडिओ कामगार ते नायक-नायिका एकाच चवीचा चहा पीतात. बातमीला वेगळीच चव येईल. पण चित्रपटसृष्टीत रेकॉर्डिंग स्टुडिओपासून वितरक-प्रदर्शकाच्या कार्यालयात कुठेही कधीही जा, पहिला प्रश्न असतो, ‘आप चाय लेंगे ना?’ ही या क्षेत्राची दुर्लक्षित खासियत. गंमत म्हणजे येथे सगळीकडेच एकाच चवीचा चहा मिळतो. ही मात्र वेगळ्याच प्रकारची एकीच म्हणायला हवी. पण अजून एक गंमत म्हणजे, चित्रपटाच्या सेटवर एखाद्या स्टारला भेटायला गेल्यावर तो आपल्याला युनिटच्या काचेच्या ग्लासात चहा देतो व स्वतः वेगळ्या महागड्या स्टीलच्या ग्लासात स्पेशल चहा पितो. एखादा जॅकी श्रॉफ अथवा उर्मिला मातोंडकर अपवाद. काचेच्या ग्लासची जागा आता छोट्या प्लॅस्टिक ग्लासने घेतलीय. काही असो, मराठी असो की हिंदी चित्रपटसृष्टीला चहा भरपूर उर्जा देतो.

काही प्रसंगात वा गाण्यातही चहा आहेच. ‘दो घुट चाय पी’ या १९६१ च्या ‘संजोग ‘ चित्रपटातील गाण्यापासून गीत-संगीतात चहा आला . राजेश खन्ना व टीना मुनिमचे सौतन’ ( १९८३) मधले ‘इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है’ हे गाणे सर्वकालीन लोकप्रिय. ‘गरम गरम चाय पियो’ (बनफूल), ‘एक गरम चाय की प्याली हो’ (हर दिल जो प्यार करेगा) अशी चहावाली गाणी बरीच.  चित्रपटसृष्टी व चहा यांच्या नात्याचा आणखीन एक छान फ्लॅशबॅक आहे, साठ-सत्तरच्या दशकात मुंबईतील इराणी हॉटेलमध्ये ज्युक बॉक्स असे. त्यात चार आण्यांचे नाणे (नंतर ते आठ आणे झाले) त्या बॉक्समध्ये टाकून आपल्या आवडत्या गाण्याचा नंबर दाबायचा. आणि आपले गाणे येईपर्यंत इतरांच्या पसंतीची गाणी ऐकण्यासाठी कटींग चहा व बन मस्का मागवायचा.

आणखीन एक विशेष, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी राजेश खन्ना व जीतेंद्र दोघेही गिरगावकर. गंमत म्हणजे, ठाकूरव्दार नाक्यावरच्या राजेशच्या सरस्वती निवाससमोर इराणी तसाच गिरगाव नाक्यावरच्या जीतेन्द्रच्या सुंदर भवनाच्या ( पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग) समोरही इराणी हॉटेल. येथे ते दोघेही सुरुवातीच्या काळात अर्धा कप चहा पीत पीत स्वप्न रंगवत गप्पांत रमत असे किस्से गाजलेत. लक्ष्मीकांत बेर्डे गिरगावातील कुंभारवाड्याचा रहिवाशी. तो देखील इराणी हॉटेलमधील चहाचे किस्से सांगे. तर धोबीतलावच्या मेट्रो अथवा एडवर्ड चित्रपटगृहात जाणारा रसिक शक्यतो थियेटरमध्ये चहा पीत नसे (मेट्रोत दर्जाप्रमाणे महागच असे) तो चित्रपट पाहण्यापूर्वी वा नंतर खयानी बेकरीत जाऊन केक व चहा ऑर्डर करणार. तेव्हा एकदम सहा केक दिले जात. तुम्हीच त्यातील किती खायचे ते ठरवा अशी पध्दत होती. चहा पीता पीता पिक्चरवरच्या गप्पा काही संपत नसत. नाझ चित्रपटगृहाच्या कॅन्टीनचा चहा वेगळाच अनुभव देई. तेथे चित्रपट वितरकांची कार्यालये असल्याने व्यावसायिक गप्पा कानावर पडत. ओशिवरा-वर्सोवात चित्रपट निर्मिती कार्यालये वाढताना कार्पोरेट कल्चर आले आणि चहा-कॉफीची मशिन्स आली. ते कृत्रिम वाटते, त्यात आपलेपण नाही.
चित्रपटसृष्टीतील चहाचा प्रवास व विस्तार असा चौफेर आहे ही गोडी महत्त्वपूर्ण! तुम्हीसुध्दा गरम चहाची मजा लुटा…!
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:36 pm

Web Title: international tea day 2017 blog %e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af %e0%a4%95%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%b9%e0%a5%8b
Next Stories
1 उपकारांची परतफेड म्हणून या अभिनेत्याने आपल्या मित्रांना दिले ६ कोटी रुपये
2 TOP 10 NEWS : सायरा बानो यांनी मालमत्तेबाबत केलेल्या खुलाशापासून मीना कुमारींच्या बायोपिकपर्यंत
3 ‘होम मिनिस्टर’ला टक्कर देणार ‘नवरा असावा तर असा’
Just Now!
X